नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 06:21 PM2020-09-20T18:21:56+5:302020-09-20T18:22:31+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदूरशिंगोटे - निमोण रस्ता नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चार ते पाच तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. निमोण रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सदर रस्त्याची दुरावस्था होत आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, मढी, भगवानगड आदी तिर्थक्षेत्र असणाºया ठिकाणी याच रस्त्याचा वापर केला जातो. मालवाहतूकीचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता नेहमीच खराब होत आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने चिखलातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागते. नांदूरशिंगोटे ते निमोण हा सात किलोमीटरचा रस्ता असून अडीच किलोमीटर पर्यंत जिल्हा हद्द आहे. परिसरातील गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने वाहन धारकांना खड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. नांदूरशिंगोटे गावातील दहा टक्के नागरिक निमोण रोड लगत वस्तीवर वास्तव करत असल्याने त्यांना गावात दळणवळणासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हापूर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर जागोजाग खडे पडल्याचने वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खड़े वाचविताना दुचाकीस्वारांचे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. लोणी रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दररोजची डोकेदुखी ठरत असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे.
अरुण शेळके, संचालक, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटे
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्याची झालेली दुरावस्था. (२० सिन्नर २)