नांदूरशिंगोटेला प्रथमच सभापतिपदाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:04 PM2020-01-01T23:04:24+5:302020-01-01T23:05:10+5:30
सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
सचिन सांगळे ।
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
सिन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची मंगळवारी निवड झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळीच माजी आमदार राजाभाऊ वाजे व शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांनी बर्के यांना सभापतिपदाचा शब्द दिला होता. त्यांच्या रूपाने प्रथमच नांदूरशिंगोटे गावाला सभापतिपद मिळाले आहे. यापूर्वी नांदूरशिंगोटे गणातील दोडी बुद्रुक येथील स्व. दादा गणपत केदार व बाळासाहेब वाघ यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर नांदूरशिंगोटे येथील लक्ष्मण शेळके यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या काळात अडीच वर्षे उपसभापतीची संधी मिळाली होती.
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच तालुक्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नांदूरशिंगोटे गावाला यापूर्वी तालुकापातळीवर मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे समर्थकांची गेल्या अनेक वर्षांपासून नाराजी होती. येथील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा व तालुका तसेच बाजार समिती, दूध संघ, नाईक शिक्षण संस्था आदींसह विविध पदावर काम केले आहे, परंतु तालुक्याचे मिनी मंत्रालय असणाºया ठिकाणी काम करण्याची संधी अद्याप मिळालेली नव्हती. बर्के यांच्या रूपाने पंचायत समिती स्थापनेनंतर पहिल्यांदाच तो बहुमान नांदूर गावाला मिळाला आहे. सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे समर्थक नांदूरशिंगोटे येथील दीपक बर्के यांच्या पत्नी शोभा बर्के या शिवसेनेच्या तिकिटावर नांदूर गणातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
मानोरी गावात विजयी मिरवणूक
नांदूरशिंगोटे गणातील पंचायत समिती सदस्य शोभा बर्के यांची सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याने समर्थकांनी गावात एकच जल्लोष केला. येथील रेणुकामाता मंदिराच्या पटांगणात ग्रामस्थ व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. बर्के यांचे माहेर असलेल्या मानोरी गावात सुद्धा विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकासकामे केली जातील. तालुक्यातील गावांना समान न्याय देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व शासकीय योजना तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आपले प्राधान्य राहील. - शोभा बर्के, नवनिर्वाचित सभापती, पं. स. सिन्नर.