नांदूरवैद्य गाव : दिलीपकुमार यांच्या चित्रपटातील वाड्याला नातेवाइकांनी दिला उजाळा पुन्हा जागृत झाल्या ‘गंगा जमुना’च्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:58 AM2018-01-17T00:58:56+5:302018-01-17T01:01:44+5:30
देवळाली कॅम्प : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रोकडे यांच्या वाड्यात ६२ वर्षांपूर्वी ‘गंगा जमुना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.
देवळाली कॅम्प : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रोकडे यांच्या वाड्यात ६२ वर्षांपूर्वी ‘गंगा जमुना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्या वाड्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नांदूरवैद्य येथे राजाभाऊ व विनायक रोकडे यांचा वाडा असून, त्या ठिकाणी ६२ वर्षांपूर्वी दिलीपकुमार व सायरा बानो यांची प्रमुख भूमिका असलेल्या गंगा जमुना या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्या वाड्याला दिलीपकुमार व इतर कलाकारांनी पुन्हा भेट द्यावी अशी इच्छा रोकडे यांनी दिलीपकुमार यांचे देवळाली कॅम्प येथे राहणारे पुतणे जावेद खान यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव दिलीपकुमार यांना येणे शक्य नसल्याने दिलीपकुमार यांचे पुतणे जावेद खान, नातू जहीद खान यांनी नुकतीच रोकडे यांच्या वाड्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘गंगा जमुना’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे साक्षीदार अब्दुल रशिद खान यानी वाड्यासमोरील, बैलगाडी, त्या काळची पिठाची गिरणी, पुरातन तिजोरी, कबड्डीचे मैदान आदी आहे त्या स्थितीत बघून त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी परशराम तुळशीराम मुसळे यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत कबड्डी खेळण्याच्या चित्रीकरणात सहभागी झाले होते. यावेळी चित्रपटातील ‘नैन मा नैन लगजाई तो मनमा कसक हुइबा करी’ हे गाणे गात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अब्दुल खान, नितीन देवीदास, श्याम हेमनानी, जमील सिद्दीकी, अॅड. फारूख शेख, आदित्य भाटिया, विजय तिवारी, रौफ खान, रफिक सिद्दीकी, आर. तिवारी, अश्फाक शेख, विजय तिवारी, फय्याज फैजी, अॅड. जहीर इनामदार, डी.जे. हंसवानी, अश्फाक खलिफा, अमन उल्ला खान, सय्यद जावेद अली, बशीर मन्सुरी , डॉ. असीर खान आदी उपस्थित होते.