दोन लाखांसाठी व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ पोलीसाला नांगरे पाटील यांनी केले निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:39 PM2019-05-15T14:39:00+5:302019-05-15T14:40:46+5:30
कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोव-यात सापडणारे पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक (एपीआय)दीपक गिरमे यांच्यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चौकशी अहवालावरून निलंबनाची कारवाई करून कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्हे शोध पथकात यापुर्वी कर्तव्य बजावणाºया गिरमे यांनी बढती मिळाली आणि त्यांची नेमणूक पंचवटी पोलीस ठाण्यात थेट एपीआय म्हणून नियुक्ती केली गेली. मात्र पंचवटी पोलीस ठाण्यातील त्यांची कारवाई फारशी समाधानकारकारक राहिलेली नाही. आठवडाभरापूर्वी गिरमे यांनी टकलेनगरमधील व्यावसायिक मयूर वसंत सोनवणे (३३) यांच्या राहत्या घरी मंगळवारी (दि.७) मध्यरात्री साडेबारा वाजता पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक गिरमे, शिपाई सागर पांढरे हे त्यांच्या खासगी मोटारीने पोहोचले व मयूर यास ताब्यात घेऊन मोटारीत डांबून त्यांनी आडगाव येथे मयूरचा कारखाना गाठला. तेथे त्यास बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या जवळील साठ हजार रुपयेदेखील काढून घेतल्याची तक्रार त्याने आडगाव पोलिसांकडे केली होती; मात्र आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता दुसºया दिवशी त्याच्यावर दबाव वाढवून चक्क जबाब बदलवून त्या जबाबावर मयूरची बनावट स्वाक्षरी करून संभाव्य कारवाई टाळण्यासाठीचा ‘पुरावा’ तयार केल्याचे समोर आले होते. गिरमे यांच्याविषयीची तक्रार मयूरने थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ याप्रकरणी चौकशीचे आदेश उपआयुक्तांना दिले. आठवडाभरात चौकशी पुर्ण करून अहवालामध्ये गिरमे यांच्यावर आर्थिक तोडपाणी करण्याचा ठपका ठेवला गेला. नांगरे पाटील यांनी गिरमे यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
वादग्रस्त ‘कर्तव्य’ चर्चेत
गिरमे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात वर्णी लागल्यापासून त्यांचे ‘कर्तव्य’ नेहमीच वादग्रस्त ठरले.
कधी महाविद्यालयीत युवकांना तुमचे करियर उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी, तर कधी रात्रपाळीत आर्थिक तोडपाण्याचा सातत्याने प्रयत्न, तसेच तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट विमानाने बिहारला पाठविले होते; मात्र संशयिताला परत पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यात ते अपयशी ठरले. बेजबाबदारपणामुळे संशयित आरोपी रेल्वेतून गिरमे यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. दोन महिन्यांपुर्वी एका महिलेवर पंचवटीत रात्री अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येऊनदेखील गिरमे यांनी त्या पिडितेची तक्रार घेण्यास विलंब करत तिला पोलीस ठाण्यात नको तीतका वेळ ताटकळत ठेवल्याचा आरोप त्यावेळी नातेवाईकांनी केला होता. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी दोघा पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करत यांनाही ताकीद दिली होती. विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली. पहिल्यांदाच त्यांनी‘पंचवटी’ला भेट दिली. त्यावेळी गिरमे यांचा गलथान कारभार त्यांच्यापुढे उघड झाला होता. किरकोळ मारहाणीच्या घटनेत त्यांनी चक्क प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा डायरीवर नोंदविल्याचे त्यांच्यानिदर्शनास आले होते.
गुन्हे शाखा ते पंचवटी पोलीस ठाणेमार्गे नियंत्रण कक्षात
गिरमे हे यापुर्वी गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांची वर्णी काही महिन्यांपुर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात लागली. बढती मिळाल्यानंतर त्यांना समाधानकारक कामगिरी करण्याची संधीही होती; मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरले आणि अखेर वादग्रस्त ‘कर्तव्य’मुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे गिरमे यांचा प्रवास गुन्हे शाखा ते पंचवटी पोलीस ठाणे मार्गे नियंत्रण कक्षापर्यंत येऊन थांबला. निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुख्यालयाच्या उपआयुक्त माधुरी कांगणे यांच्या आदेशाधीन राहून नोकरी करावी लागणार आहे.
---