विधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:44 AM2017-12-12T00:44:23+5:302017-12-12T00:47:09+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहत आहे.

Narayan Rane from Nashik for the Legislative Council? | विधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?

विधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?

Next
ठळक मुद्देविधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?भुजबळांना देणार शह : शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

श्याम बागुल।
नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तूर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित मांडण्यात येत आहे.
नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी, त्यांच्या महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रिमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येऊन पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे संकेतही वारंवार दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले . राजकीय पातळीवर विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर भाजपा-सेनेत एकमत झालेले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सदस्याला सहा महिन्यांच्या आत विधान सभा वा विधान परिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अलीकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ नजिकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांदा भाजपाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील. अशावेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. याशिवाय जिल्ह्णात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिंमत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे.
सख्य कामी येणार नारायण राणे यांचा तसा नाशिकशी घनिष्ठ संबंध असून, येथील राजकीय परिस्थिती त्यांना चांगलीच अवगत आहे. राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी सेना-भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचे चांगले सूत जमले होते. त्यानंतर त्यांनी कॉँग्रेस प्रवेश केल्यावरही हा लोभ कायम होता. राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाचे तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील कामगार युनियनचे अजूनही लागेबांधे आहेत. अशा परिस्थितीत राणे यांचे नेतृत्व सर्वमान्य होण्याची भाजपाला पुरेपूर खात्री आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी लागणारे ‘तोड-फोडी’चे राजकारण करण्यात राणे यांचा हातखंडा आहे. दुसरे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजपा व सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याने या निमित्ताने सेनेला खिजविण्याची आयती संधी भाजपाला मिळणार आहे.

Web Title: Narayan Rane from Nashik for the Legislative Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक