Narayan Rane: 'राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने संजय राऊतांना व्हायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:31 PM2022-03-01T16:31:48+5:302022-03-01T16:32:27+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपाशी संबंधित नेत्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
नाशिक - शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षाच्या हितासाठी काम करत नसून त्यांना मुख्यमंत्री पद हवे आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना या संदर्भात शब्द दिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पद रिक्त झालं की ते या पदावर आरुढ होतील. त्यासाठीच, त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणेंनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. तसेच, संजय राऊतांसह शिवसेनेला इशाराही दिला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपाशी संबंधित नेत्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं, यासंदर्भात बोलताना राणे यांनी संजय राऊतांनी तशी तक्रार जरूर करावी. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नावे देखील माझ्याकडे आहेत, ती सुद्धा लवकरच इडीकडे देण्यात येणार आहेत. राऊत यांच्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांचे उद्योग मला अधिक माहीत आहेत, असेही राणे म्हणाले. भुजबळांना अडीच वर्षे तुरुंगात राहावे लागले, असेच शिवसेनेच्या नेत्यांचेही आहे. अनेकांची कागदं माझ्याकडे तयार आहेत. फक्त एफआयआर दाखल करायचा अन् अटक करायचं एवढंच काम बाकी आहे, असा इशाराही राणेंनी दिला.
मुख्यमंत्री घरी, महाराष्ट्र आजारी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे युक्रेन येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री मंत्रालयात आणि कॅबिनेटच्या बैठकीत जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिशा सालीयन हिला न्याय देण्यासाठी आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे. मात्र, ते जर पोलिसांत तक्रार करत असतील तर या मागे कोण आहे हे सांगायला नको असेही राणेंनी म्हटले.