तात्या टोपे यांचे स्मारक दर्जेदार व्हावे नरेंद्र मोदी : येवल्याच्या स्मारक समितीने दिल्लीत घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:15 AM2018-04-04T00:15:54+5:302018-04-04T00:15:54+5:30
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे व येवल्याचे थोर सुपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या येवला या जन्मभूमीतून राष्ट्र अस्मिता आणि राष्ट्रकार्यासाठी युवक उत्साहाने थेट दिल्लीत भेटीला आल्याने आनंद वाटला.
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे व येवल्याचे थोर सुपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या येवला या जन्मभूमीतून राष्ट्र अस्मिता आणि राष्ट्रकार्यासाठी युवक उत्साहाने थेट दिल्लीत भेटीला आल्याने आनंद वाटला. येवल्याचे थोर सुपुत्र व १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे सेनापती तात्या टोपे यांच्या येवल्यातील राष्ट्रीय स्मारकाची इमारत दर्जेदार आणि उत्कृष्ट झाली पाहीजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येवला येथील सेनापती तात्याटोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीच्या सदस्यांशी दिल्ली येथे लोकसभेच्या आवारात बोलताना व्यक्त केले. सेनापती तात्या टोपे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे साडेदहा कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. देशातील पहिल्या स्वातंत्र्य- संग्रामाच्या या सेनापती तात्या टोपे यांच्या जन्मभूमीत यातून भव्य स्मारक साकारले जाणार आहे. या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे येवलावासीय, देशवासीयांतर्फे व सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीकडून आभार मानण्यासाठी व मोदींना गौरवचिन्ह देण्यासाठी समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांच्यासह समिती सदस्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने लोकसभेतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट भेट घेतली. मंगळवारी लोकसभेच्या व्यस्त कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमवेत येवल्याच्या समिती सदस्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्मारकासाठी येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. सेनापती तात्या टोपे स्मारक इमारत उत्कृष्ट दर्जाची झाली पाहिजे असे सांगून समितीने स्मारक पूर्ण झाल्यावर उद्घाटनासाठी येण्याचे निमंत्रण मोदी यांना दिले. यावेळी श्रीकांत खंदारे यांनी खास येवला शैलीचा फेटा पंतप्रधान मोदी यांना बांधला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे, सदस्य माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी, माजी नगरसेवक संजय कुक्कर, धीरज परदेशी, बडाअण्णा शिंदे, संजय सोमासे, मयूर मेघराज, श्रीकांत खंदारे, डॉ. संदीप पवार यांच्यासह नाशिकच्या क्यूरी मानवता हॉस्पिटलचे डॉ. राज नगरकर उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी येवल्यातील सेनापती तात्या टोपे यांच्या गंगादरवाजा परिसरातील जन्मस्थळाची जागा अविकसित असल्याचे सांगितले. ही जागा येवलेकरांसाठी अस्मितेची असल्याने येथेदेखील सुधारणा करावी, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केली. यावर मोदींनी स्मारक झाले की जन्मस्थळाच्या जागेचा विकास करू, असे आश्वासन यावेळी दिले.