नरेंद्र मोदींनी देशाला हुकुमशाहीकडे नेले : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:37 PM2019-04-24T21:37:12+5:302019-04-24T21:39:39+5:30
आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘जीएसटी’सारखी करप्रणाली लागू करून शेती, उद्योगधंद्यांची वाट लावली. तसेच नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. मोदी यांच्या मनमानी निर्णय देशाला हूकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाण्यास पुरक ठरल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले, सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत मोदी महाराष्टÑात केवळ ७वेळा आले; मात्र येथील समस्यांबद्दल एक चकार शब्द काढला नाही. ते फक्त राहुल गांधींनी काय केले? गांधी परिवाराने काय केले? हेच प्रश्न जनतेला विचारत होते. आता त्यात वेळ न घालवता मोदी यांनी पाच वर्षात काय केले, ते सांगावे. या सरकारच्या काळात शेती आणि उद्योगधंद्ये उद्धवस्त झाले असून राज्यासह देशात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. सत्ताधारी भाजपा सरकारने ‘राफेल’सारख्या लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी बोलताना केला.