"मोदी लक्षद्वीपला गेले अन् मालदीवमध्ये भूकंप झाला"; मुख्यमंत्र्यांकडून असंही कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:30 PM2024-01-12T13:30:13+5:302024-01-12T13:32:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी –न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात घेतलेली डुबकी आजही चर्चेचा विषय आहे. मोदींच्या एका डुबकीमुळे मालदीवला मोठं आर्थिक नुकसान सहन करावा लागलं. याशिवाय भारतीयांचा, भारतातील सेलिब्रिटी, उद्योगपती आणि क्रिकेटर्संचा रोषही सहन करावा लागला. त्यामुळे, मोदींच्या एका डुबकीने काय काय घडलं याचा प्रचार आणि प्रसार करण्यात भाजपा समर्थक कुठेही कमी पडत नाहीत. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन मोदींच्याहस्ते झाले. यावेळी, संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी –न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. मात्र, तत्पूर्वी नाशिक येथील राष्ट्रीय युवा मोहत्सवात मोदींनी सहभाग घेतला. यावेळी, व्यासपीठावर राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मोदींजीच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत असून जागतिक पातळीवर देशाचा दबदबा निर्माण झाल्याचं शिंदेंनी म्हटलं. तसेच, मोदींच्या लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावरील फोटोनंतर मालदीवला लागलेल्या मिरचीचा उल्लेख करताना, मोदी लक्षद्वीपला गेले अन् मालदीवमध्ये भूकंप झाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंनी राम मंदिराचा उल्लेख करत, नाशिक ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्याचं म्हटलं. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याचं हे शुभ संकेत आहे. कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न, देशातील सर्वच लोकांचं राम मंदिर उभारणीचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्यावतीने आभार मानतो, असे म्हणत मोदी है तो मुमकीन है... असेही शिंदेंनी म्हटले. याचेवळी, मोदी लक्षद्वीपला गेले अन् मालदीपमध्ये भूकंप आला. आता, आमच्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. आज आपल्या देशाचा जगात डंका वाजतोय, जगात भारताचा नाव आदराने घेतलं जातंय. जी२० परिषद झाली, मिशन चांद्रयान यशस्वी झालं, हे सर्व मोदींमुळेच होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. मोदींच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असून भारत लवकरच ५ ट्रिलियन इकॉनॉमी असेलला देश बनेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
शिवसेना ठाकरे गटाचा कार्यक्रमावर बहिष्कार
दरम्यान, मुंबईतील शिवडी-नाव्हा-शेवा अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी राजकीय वादंग निर्माण झाले असून या कार्यक्रमाला ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक आमदार, खासदारांनाही रात्री उशिरा आणि आज सकाळी निमंत्रण पाठवण्यात आलं, असं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.