राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 03:34 PM2019-09-19T15:34:29+5:302019-09-19T15:36:00+5:30
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला.
नाशिक : राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केले. तसेच शिवसेनेसह राम मंदिरावर बोलणाऱ्या नेत्यांना त्यांनी नाव न घेता टोला लगावत विनंतही केली आहे.
आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा, काश्मीरचे 370 कलम यासह विविध मुद्दयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राम मंदिरावरही त्यांची भुमिका स्पष्ट केली. तसेच मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात माहीत नाही. का ते या प्रकरणामध्ये अडचण निर्माण करू पाहत आहेत? सर्वोच्च न्यायालय, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा. या नाशिकच्या पवित्र जमिनीवरून मी अशा वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, रामासाठी, देवासाठी डोळे बंद करून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राम मंदिराची मागणी रेटली होती. जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मोदींचा हा वाचाळवीरांचा टोला अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
PM Modi in Nashik, Maharashtra: I am astonished where did these 'bayan bahadur' come from? Why are they creating obstacles? We should trust Supreme Court, the Constitution & judiciary of India. I request these people to trust the judiciary of India, for God's sake. https://t.co/ELgPvP7XB5
— ANI (@ANI) September 19, 2019
आठवलेंचाही सबुरीचा सल्ला
शिवसेनेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सबुरीचा सल्ला दिला आहे. राम मंदिराचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे शिवसेनेनं न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी, असं आठवलेंनी म्हटलं. आगामी विधानसभा निवडणूक आरपीआय भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.