पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या नासाका रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:40 AM2018-06-19T00:40:56+5:302018-06-19T00:40:56+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नासाका रोडची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी लक्ष घालून तात्पुरती डागडुजी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नासाका रोडची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी लक्ष घालून तात्पुरती डागडुजी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पळसे येथील नाशिक साखर कारखाना हा रस्ता कारखान्याच्या स्वमालकीचा असल्याने त्यावर शासनाकडून खर्च केला जात नाही. माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत आर. आर. पाटील यांना आमंत्रित केले होते. तेव्हा मुरूम टाकून तात्पुरता रस्ता बनविण्यात आला होता. मात्र त्यानंतर कारखानाच बंद पडल्याने नासाका रोडला वालीच राहिलेला नाही. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा नासाकारोड आहे. नासाका रोडवर वडगाव पिंगळा, राहुरी, दोनवाडे, नानेगाव, शेवगदारणा ही गावे असून येथून अजून आजूबाजूच्या गावांत जाता येते. त्यामुळे नासाका रोडवर विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदींची सतत वर्दळ असते. मात्र नासाका रोडला कोणी वालीच नसल्यामुळे रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले असून ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
ग्रामस्थांना दुसरा पर्यायच नसल्यामुळे याच मार्गावरून ये-जा करावी लागते. तर सायकलस्वार, दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने यांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. यामुळे वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्ता हस्तांतर करून घ्यावा
कारखान्याच्या मालकीचा असलेला नासाकारोड दुरुस्ती करण्यास हरकत नसल्याचे पत्र कारखान्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेला सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आले आहे. त्यामुळे खासदार, आमदारांनी लक्ष घालून नासाकारोड राज्य शासनाकडे हस्तांतरित करून त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करून द्यावे. राज्य शासनाकडे रस्ता हस्तांतरित झाल्यास या ग्रामीण भागाचा प्रश्न कायमचा निकाली निघेल.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाशिकरोड बसस्थानकातून येणारी बस काही महिन्यांपूर्वीच बंद झाल्याने शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहे. सिन्नर डेपोची सायंकाळी येणारी एकमेव बस वडगाव पिंगळा येथे मुक्कामासाठी असते. सकाळी चिंचोली किंवा पुन्हा बंगाली बाबा दर्गा मार्गे निघून जाते. पावसाळा सुरू झाला असून, अजून म्हणावे तसे पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी पाहणी करून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.