दोन दिवसांच्या बंदमुळे नाशिक-१ डेपोचे घटले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:40+5:302021-04-12T04:13:40+5:30
नाशिक : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला आहे. जिल्ह्यात महामंडळाचे १३ डेपो असून, सुमारे सातशे बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सेवा चालविली जाते. नाशिक शहरात नाशिक-१ आणि नाशिक-२ असे दोन आगार असून, लांब पल्ल्याच्या बसेस आगार क्रमांक १ मधून सोडल्या जातात.
कोरानाचे संक्रमण वाढत गेल्याने शहरात काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बंद पुकारण्यात येत आहे. या बंदमुळे बाजारपेठा बंद आहेतच शिवाय नागरिकदेखील घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडले आहेत. आठवडे बाजार केव्हाच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झाला असून, महामंडळावरदेखील प्रवासी संख्येचा परिणाम जाणवत आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्व आगारांची असून, केवळ नाशिक आगार क्रमांक १ चा विचार केला तरी त्यावरून जिल्ह्यातील बसआगारांचा अंदाज येतो.
नाशिक आगार-१
एकूण बसेस १६१
दोन दिवसांत धावलेल्या बसेस ७०
झालेल्या फेऱ्या : ८०
पैसे मिळाले दोन दिवसांत ५.५० लाख
--दोन दिवसांत लाखोंचे नुकसान--
नाशिक आगारातून पुणे, बोरीवली, औरंगाद, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात बसेस धावतात. गेल्या जानेवारीपासून महामंडळाच्या बसेस रुळावर येत असतांनाच जानेवारीपासून पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढल्याने नाशिक आगारातून धावणाऱ्या बसेसची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. दररोज ५० ते ५५ हजार किकलोमीटर धावणाऱ्या बसेस अवघ्या २० हजार किलोमीटरपर्यंत येऊन थांबल्या आहेत.
शनिवार पेक्षाही रविवारी सर्वाधिक परिणाम झाल्याचे जाणवले. रविवार केवळ १० ते १२ हजार किलोमीटरच बसेस धावल्या. प्रवासी नसल्यामुळे झालेला परिणाम लॉकडाऊनच्या शक्यतेने अजूनही कमी झाला आहे.
---इन्फो--
अवघ्या २० ते २५ गाड्या
मागीलवर्षीच्या परिस्थितीतून सावरत नाशिक आगार-१ मधून किमान १३० बसेसचे ऑपरेशन सुरू होते. जानेवारीत चांगले उत्पन्न मिळत असतांनाच आता पुन्हा कोरोनाचा फटका बसला आहे. इतरवेळी फक्त ३५ ते ४० बसेस धावत आहेत, तर शनिवार, रविवारी हीच संख्या २४ ते ३० गाड्यांवर आली आहे.
--इन्फो--
सर्वच आगारांना बसला फटका
नाशिक विभागात नाशिक-१,मालेगाव, सटाणा, सिन्नर, मनमाड, कळवण, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, पेठ, पिंपळगाव, येवला, नाशिक-२ असे डेपो असून, या सर्वच डेपोंमधील दैनंदिन उत्पन्नात घट झालेली आहे. नियमित गाड्या बंद करण्याची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांनादेखील काम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक-१आगार त्यापैकीच एक असून, यावरून जिल्ह्यातील आगाराची परिस्थितीदेखील समोर येते.