ओखी वादळाचा नाशिक जिल्ह्यातील १४२ गावांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:03 PM2018-01-01T19:03:53+5:302018-01-01T19:06:22+5:30
महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या.
नाशिक : गेल्या महिन्यात ४ व ५ डिसेंबर रोजी ओखी चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांनाही चांगलाच फटका बसला असून, कृषी खात्याने प्रथम दर्शनी केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १४२ गावांना कमी-अधिक प्रमाणात या च्रकीवादळामुळे आलेल्या पावसाने झोडपून काढले आहे, त्यात ११८४ शेतक-यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या. त्यामुळे काढणीवर आलेल्या द्राक्षबागांवर मोठे संकट कोसळले. काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले तर झोडपणा-या पावसामुळे घडे कोसळून पडण्याच्या व मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले. खळ्यावर काढून ठेवलेला कांदा, मका भिजण्याचेही प्रकार घडले आहेत. संपुर्ण राज्यातच ओखी वादळाने झोडपून काढल्यामुळे राज्य सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उशीराने काढले. त्यामुळे कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्याविषयीही संशय घेतला जात आहे. त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील चांदवड, बागलाण तालुक्यातील सुमारे १२३१ हेक्टरवरील द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रावरील कारले पिकाचे नुकसान झाले. मात्र पावसाच्या या तडाख्यापासून तुर वाचल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.