नाशिकमध्ये पहिल्या चार तासांत १५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:13 PM2019-04-29T12:13:50+5:302019-04-29T12:18:19+5:30
नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी ...
नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी १५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. इतकेच नव्हे तर मशिदींमधूनही धर्मगुरूंनी मतदान करण्याचे आवाहन करत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. नाशिक शहारात मतदार याद्यांमध्ये नावांचा घोळ, घरपोच मतदार चिठठया न मिळाल्याच्या तक्रारी असतानाही नाशिककर मोठ्या उत्साहाने ‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर करत मतदार ओळखपत्राच्या क्रमांकावरून यादी भाग व अनुक्रमांक शोधत बुथचा नाव पत्ताही माहिती करून घेताना दिसून येत आहेत. यामुळे मतदान केंद्रात पोहचून नागरिक आपले मतदार ओळखपत्र दाखवत यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगून मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान जनजागृतीचा प्रभाव दिसून येत असून नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीय नाशिककर नागरिकांसाठी सुध्दा मतदानासाठी मुळ गावी येऊन सकाळी मतदान केले. सेंट फ्रान्सिस्को, जर्मनी येथून शहरात दाखल होत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूणच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगदेखील तितक्याच उत्साहाने लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत.
यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात सरासरी सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.४५ टक्के इतके मतदान होऊ शकले. यामध्ये नाशिक तालुक्यात १४.२, नाशिक पुर्वमध्ये १५.२१, नाशिक मध्यमध्ये १२.७४, नाशिक पश्चिममध्ये १८.३२ तर नाशिक देवळाली मतदारसंघात १०.१८ आणि नाशिक इगतपुरी मतदारसंगात १४.५० टक्के इतके मतदान झाल्याची नोंद जिल्हा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.