Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न
By अझहर शेख | Published: July 12, 2023 01:45 PM2023-07-12T13:45:55+5:302023-07-12T13:46:29+5:30
Nashik: कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे.
- नरेंद्र दंडगव्हाळ
नाशिक : कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन मद्यधुंद गावगुंडांनी हातात कोयते घेऊन रहिवाशांच्या अंगणातील एक- दोन नव्हे, तर तब्बल १६ कार, एका रिक्षाची तोडफोड करत दहशत पसरविली. त्रिमूर्ती चौकातील हेडगेवारनगरमध्ये हा प्रकार सुरू असताना अंबड पोलिसांच्या गस्तीपथकाला त्याचा मागमुसही लागला नाही हे विशेष!
कामगारांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या सिडको येथील त्रिमूर्ती चौकाजवळ हेडगेवानगरमध्ये पहाटे तीन वाजेच्या सुमारास रहिवासी साखरझोपेत असताना अचानकपणे जोरजोराने तोडफोडीचा आवाज सुरू झाला. रहिवासी हादरून झोपेतून जागे झाले. घराबाहेरील दिवे सुरू करून बघितले असता दोन मद्यधुंद गावगुंड हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्रे घेत मनात येईल त्याप्रमाणे कारच्या काचा फोडत होते. एका इसमाने हा सगळा प्रकार बघून धाडस करत घराबाहेर जात त्या गावगुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यास कोयत्याचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सोळा मोटारी व एका रिक्षाची तोडफोड झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या पथकाने संशयित गावगुंड जयेश हर्षवर्धन भालेराव (२०) व सूरज दिलीप चव्हाण (१९, दोघे रा. दुर्गानगर, सिडको) यांना बेड्या ठोकल्या.
संशयित जयेश व सूरज या दोघांनी दारूच्या नशेत हेडगेवार चौकात हातात कोयता हाती घेत दहशत पसरविण्याचा प्रकार केला. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोघे गुंड परिसरात दहशत पसरवित होते. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी परिसरातील नागरिक संदीप आहेर हे घरातून बाहेर आले व त्यांनी या दोघांना गाड्यांचे नुकसान करताना बघितले असता त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघा संशयितांनी आहेर यांना शास्त्राचा धाक दाखवत जागीच ठार मारून टाकेन, असे धमकावले. आहेर यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी संशयित आरोपी जयेश भालेराव व सूरज चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.