नाशिकमध्ये २३ नवे संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:17 AM2020-04-08T00:17:03+5:302020-04-08T00:17:24+5:30
कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्णातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली असतानाच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी (दि.६) आढळून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील नऊ संशयितांचा समावेश आहे.
नाशिक : कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्णातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली असतानाच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी (दि.६) आढळून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील नऊ संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले १३ नमुने सर्व निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्णात कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून, दोन्ही बाधित रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले. सोमवारी गोविंद नगर भागातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला तो संपूर्ण परिसर मंगळवारी सील करण्यात आला. सुमारे तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून, संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम दिवसभर राबविण्यात आली.
आरोग्य विभागाने मंगळवारी राबविलेल्या मोहिमेत २५९ होम क्वॉरंटाइन व्यक्तींचे सर्वेक्षण केले. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सोमवारी एकूण २७ कोरोनासदृश रुग्णांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्टÑीय विषाणू संशोधन केंद्र येथे पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी १३ अहवाल प्राप्त झलेले असून, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल रात्री ९ वाजेनंतर प्राप्त होण्याची शक्यता आहे.