Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

By दिनेश पाठक | Published: April 17, 2024 11:33 AM2024-04-17T11:33:23+5:302024-04-17T11:37:59+5:30

Nashik Onion Market News: लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून ये

Nashik: 500 crore loss in market committees in Nashik district; Onion farmers on the wind | Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

- दिनेश पाठक 
नाशिक - लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात कामकाज पूर्ववत सुरू न झाल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार निबंधक फय्याज मुलानी यांनी दिली. 

बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असताना देखील मंगळवारी चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच हाेते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडला जात आहे. दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि.१७) देखील सकाळी १३ बाजार समित्यांमध्ये कांदा व इतर शेतीमालाची विक्री सुरू झाली नव्हती. सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांदा काढण्यास सुरूवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हात कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो कांदा घेऊन येऊ शकत नाही.

बाजार समित्यांचे आदेशही धाब्यावर
बंदचा परिणाम बाजार समितीच्या उत्पनावर होत असून व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासक व सहकार विभागाने देऊनही व्यापारी आदेश धाब्यावर बसवित असल्याचे दिसून येते. समन्वयातून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
 
कांदा व्यापाऱ्यांची चौकशी सुरूच
बाजार समित्यांमध्ये प्रचलित पद्धतीने कांदा खरेदीचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आदेश घुडकावत कांदा व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी मंगळवारी (ता.१६) देखील जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या १२ पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

परवाने नसताना बाहेर परस्पर खरेदी
व्यापाऱ्यांनी आतमध्ये बंद पुकारला असताना काही ठिकाणी मात्र कांदा व इतर शेतमाल बाहेरच्या बाहेर खरेदी केला जात असल्याचे उघड झाल्यावर अशा व्यापाऱ्यांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे. खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू केले. विनापरवानगी सुरू झालेली ही केंद्रे बेकायदा असून, त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदने जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती. त्या अनुशंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी सुरू होताच काही ठिकाणी बाहेरच्या बाहेर सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली. बागलाण, वणी (ता. दिंडोरी), अंदरसूल (ता. येवला) उमराणे (ता. देवळा), सायखेडा (ता. निफाड) आदी ठिकाणी खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू झाले होते.

Web Title: Nashik: 500 crore loss in market committees in Nashik district; Onion farmers on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.