नाशिक @6.2 : तापमानाचा पारा पुन्हा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:04 PM2019-01-01T18:04:16+5:302019-01-01T18:12:01+5:30
या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता.
नाशिक: पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस लोटले असून, थंडीचा कडाका शहरात कायम असल्याने वातावरणात गारठा टिकून आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.१) किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून, ६.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले.
थंडीच्या या हंगामातील नीचांकी नोंद शनिवारी (दि.२९) ५.१ अंश इतकी झाली. गुरुवारी (दि.२७) पारा ५.७ अंशांवर सरकला होता.
यामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. थंडीची तीव्रता सोमवारी जरी काहीशी कमी जाणवली असली तरी मंगळवारी मात्र पहाटे थंडीचा जोर अधिक राहिला. कारण सोमवारी मध्यरात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागले होते. डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याने ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. त्यामुळे २०१७ मधील ५.४ अंश किमान तापमान नोंदीचा विक्रम मोडित निघाला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान दहा अंशांच्या खाली स्थिरावत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून निफाड तालुका गोठलाही आहे. निफाडचे तापमान तर पाच अंशांच्या खाली नोंदविले जात असल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत. थंडीचा वाढता कडाका नागरिकांना त्रस्त करणारा ठरू लागला आहे. पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस होऊनदेखील थंडीच्या तीव्रतेपासून दिलासा मिळता मिळत नसल्याने नागरिकही चिंतेत सापडले आहे. शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यंदा अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक आहे.
नाशिककर त्रस्त, औरंगाबादकरांना दिलासा
राज्यात सर्वाधिक कमी तापमान सलग दुस-या दिवशी अहमदनगरमध्ये ४.६ नोंदविले गेले तर नागपूरमध्ये ५.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील तिस-या क्रमांकाचे सर्वाधिक थंडी असलेले शहर सध्या नाशिक असून, महाबळेश्वरमध्येही पारा १२.४ अंशांवर तर औरंगाबादकरांनाही थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असून, पारा ८.४ अंशांपर्यंत वर सरकला आहे. गोंदियामध्ये ६.७ तर चंद्रपूरमध्ये ६.८ अंश किमान तापमानाची मंगळवारी सकाळी नोंद झाली.
राज्यातील या शहरांमध्ये कडाका (किमान तापमान अंशात)
अहमदनगर- ४.६
नागपूर- ५.४
अकोला- ७.२
परभणी- ७.५
अमरावती- ९.८
औरंगाबाद- ८.४
चंद्रपूर- ६.८
गोंदिया- ६.७