नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लोभ 'त्या' १० जणांच्या जीवावर बेतला; बसच्या 'आतली माहिती' उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:37 PM2022-10-29T12:37:27+5:302022-10-29T12:39:14+5:30

या घटनेसंदर्भात सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.

Nashik accident: Driver's greed kills 10; Bus 'inside information' revealed | नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लोभ 'त्या' १० जणांच्या जीवावर बेतला; बसच्या 'आतली माहिती' उघड

नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लोभ 'त्या' १० जणांच्या जीवावर बेतला; बसच्या 'आतली माहिती' उघड

googlenewsNext

संदीप झिरवाळ

पंचवटी : औरंगाबाद महामार्गावर पंधरवड्यापूर्वी भल्या पहाटे झालेल्या लक्झरी बस ट्रक दुर्घटनेत एकूण १३ प्रवासी मृत्युमुखी पडले. आगाऊ बुकिंग न करता यवतमाळ-नाशिक प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या दहा प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच अपघातसमयी बसमध्ये चालकांसह साठ लोक होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.

यवतमाळ येथून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या स्लीप कोच लक्झरी बस (एमएच  २९ एडब्लू ३१००) आणि आयशर ट्रक (जीजे ०५ बीएक्स ०२२६) यामध्ये जोरदार धडक झाली होती. धडकेनंतर संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे १२ प्रवासी होरपळून जागेवर ठार झाले होते, तर एका प्रवाशाने दोन दिवसांपूर्वी प्राण सोडले. ही भीषण दुर्घटना तपोवनाजवळ कैलासनगर चौफुलीवर शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या अपघाताने ट्रॅव्हल्सकडून केल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसह रस्ता सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणेची मदत अशा सर्वच बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

प्राणही गेले अन् साडेतीन लाखांची रोकडही जळाली
> यवतमाळ येथून नाशिकला कार खरेदीसाठी येत असलेल्या एका प्रवाशाचा या दुर्घटनेत नाशिकमध्येच मृत्यू झाला.
> कार खरेदीसाठी सोबत असलेल्या बॅगेत त्याने सुमारे साडेतीन लाख रुपये घेतलेले होते. या रोकडचीही राख झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.
> त्या प्रवाशाने नाशिकमध्ये राहणाऱ्या आपल्या भाच्याला प्रवासादरम्यान मी नाशिकला कार घेण्यासाठी येत असल्याचे फोनवरून कळविलेसुद्धा होते.

नाशिकचे दाम्पत्य बचावले
> यवतमाळ येथून निघालेल्या या बसमध्ये नाशिकचे सेवानिवृत्त प्राध्यापक हे त्यांच्या पत्नीसह प्रवास करत होते. त्यांचे दैव बलवत्तर असल्यामुळे ते या भीषण दुर्घटनेतून बचावले. विदर्भातून येणाऱ्या बसेसची संख्या तशी कमीच असते.
> या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चालकाने बसविल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर यवतमाळ येथून बुकिंग न करता मुंबई, कल्याणकडे जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून प्रती प्रवासी सहाशे ते सातशे रुपये भाडे ठरले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

अहवालात नेमके काय?
> ज्यावेळी बसला अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये चालकासह एकूण ६० लोक होते. बसची मूळ आसन क्षमता ही ३० प्रवाशांची असून, त्यापेक्षा दुप्पट लोक बसमधून प्रवास करत होते. मृतांमध्ये दहा प्रवासी असे आहेत की त्यांनी आगाऊ बुकिंग न घेता वाटेतून या बसमधून प्रवास सुरू केला होता.
> अवैध प्रवाशांना बसमध्ये असलेल्या अरुंद जागेत झोपविण्यात आले होते. बसचालकाने त्याच्या आर्थिक लोभापायी वाटेतून अतिरिक्त ३० प्रवाशांचा भरणा केला होता. बसच्या पॅसेजमध्ये बसविलेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. परिणामी बसला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Nashik accident: Driver's greed kills 10; Bus 'inside information' revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक