नाशिकमध्ये भारिप बहुजन महासंघाचे सरकारच्या विरोधात घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:03 PM2018-04-03T16:03:50+5:302018-04-03T16:03:50+5:30
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील बहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात
नाशिक : भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भारिप बहुजन महासंघाने घोषित केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद केला.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील बहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याची केलेली मोडतोड दुरुस्त करा, यांसह नाशिक शहरात कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने उभे करण्यासाठी जागा नसताना पोलिसांकडून सदर वाहने उचलून नेली जात असून, त्यापोटी ७०० ते ८०० रुपयांचा दंड आकारला जातो. जो महापालिका पार्किंगची व्यवस्था करीत नाही तोपर्यंत दंड आकारण्यात येऊ नये, अशी मागणीही आंदोलकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष वामनराव गायकवाड, अरविंद जगताप, विनय कटारे, गौतम बागुल, अरुण जाधव, राजू गोतीस, संजय तायडे, करुणासागर पगारे, अजय काळे, महेंद्र जाधव, सम्राट पगारे, विश्वनाथ भालेराव, जितेश शार्दुल, रसंगीता पवार, प्रतिमा जाधव, सविता खैरनार, मिलिंद पगारे, अशोक मोरे, प्रतिभा पाणपाटील, जालिंदर पगारे, सागर बोडके, अमोल मोरे, विलास खरात, परेश सोनवणे, बाळा गायकवाड, दीपचंद दोंदे, मोहन म्हसदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, ओबीसी संघटना, यशवंत सेना, आदिवासी जनआंदोलन, भाकप, मराठा महासंघ, लिंगायत समाज संघाने पाठिंबा दिल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाने केला.