Nashik: अल निनो आधीच नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट, पाणीसाठ्यात लक्षणीय घट, पाच तालुक्यात 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू
By संजय पाठक | Published: April 25, 2023 11:15 AM2023-04-25T11:15:37+5:302023-04-25T11:16:11+5:30
Water Scarcity Crisis In Nashik: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे.
- संजय पाठक
नाशिक- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या 24 धरणांमध्ये 26 हजार 741 दशलक्ष घनफूट म्हणजेच एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे.
नाशिक जिल्ह्यातील 29 गाव आणि दहा वाड्यांना 21 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्याला बसली असून या तालुक्यातील 19 गावे आणि सात वाड्यांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मालेगाव तालुक्यात तीन गावं आणि एका वाडीला 3 टँकरने तसेच देवळा आणि बागलाण मध्ये एकेक गाव तर चांदवड मध्ये पाच गावं आणि एका वाडीला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मालेगावात 6 आणि देवळा तालुक्यात 3 या प्रमाणे 9 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून जुलै मध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता पासून टँकरची संख्या वाढू लागली आहे.