नाशिक परिक्षेत्र लाचखोरीत आघाडीवर; ३९ शासकिय अधिकारी अव्वल, सर्वाधिक १६१ सापळे
By अझहर शेख | Published: January 1, 2024 06:46 PM2024-01-01T18:46:55+5:302024-01-01T18:47:27+5:30
महसूल व पोलिस खात्यातील लाचखोरी २०२३ सालातही आघाडीवर राहिली.
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षी एकुण १४ क्लास-१ व २५ क्लास-२च्या अधिकारी विविध कारणास्तव लाचेची मागणी करताना लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एकुण २३५ लाचखोरांविरूद्ध गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. सर्वाधिक ६२सापळे हे नाशिक जिल्ह्यात लावण्यात आले होते. महसूल व पोलिस खात्यातील लाचखोरी २०२३सालातही आघाडीवर राहिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आदेशान्वये पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकुण १६१सापळा कारवाया करत भ्रष्टाचारी शासकिय लोकसेवक व त्यांच्या दलालांना दणका दिला. नाशिक परिक्षेत्रांतर्गत राज्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. यामुळे हे परिक्षेत्र राज्यात अव्वलस्थानावर राहिले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ साली लाचखोरीत ३७ गुन्ह्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
नाशिक परिक्षेत्रात वर्ग-३चे १२६ तर वर्ग-४मधील१४ आणि अन्य लोकसेवक १७ व ३९ खासगी व्यक्तींना लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यास पथकांना यश आले आहे. नाशिक परिक्षेत्र सर्वाधिक लाचखोरी व लाखो ते कोटीपर्यंतचे लाचेच्या रकमांमुळे २०२३साली सर्वाधिक चर्चेत राहिले. एकुण ६गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामध्ये नाशिक, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गुन्ह्यांचा समावेा आहे. यामुळे भ्रष्टाचारात राज्यात नाशिकने अव्वल क्रमांक गाठला होता, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२४ साली लाचखोरीवर अंकुश ठेवत भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्याचे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागापुढे कायम आहे.
जिल्हानिहाय सापळे असे....
नाशिक- ६२
अहमदनगर-३४
जळगाव-३२
धुळे- १८
नंदुरबार-१५
परिक्षेत्रातील विभागनिहाय कारवाया अशा...
महसूल-३५
पोलिस-३०
जिल्हा परिषद-१५
महावितरण-१०
सहकार- ८
पंचायत समिती-७
भुमी अभिलेख-७