नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका
By संकेत शुक्ला | Updated: March 25, 2025 14:42 IST2025-03-25T14:39:26+5:302025-03-25T14:42:36+5:30
Nashik Latest News: नागपूरच्या भूगर्भ अभ्यास विभागातील तज्ज्ञांनी अभ्यास दौरा केला होता. त्यानंतर या पथकाने अहवाल सादर केला असून, त्यात भूकंपाचा धोका असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे.

नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका
-संकेत शुक्ल, नाशिक
नाशिक जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत तपासणी करण्यास आलेल्या तज्ज्ञांनी जिल्ह्यातून जाणारी मुख्य अप्पर गोदावरी प्रभावित झाल्याने या भागातील रहिवाशांना जाणवलेल्या भूकंपाचे संभाव्य कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काही भागात बसणारे भूकंपाचे धक्के चिंतेचे कारण असून, त्याचा सूक्ष्म अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्यातील काही भूकंपाचे धक्के यंत्रावर नोंद झालेले नसल्याने त्यासाठी योग्य त्या क्षमतेची यंत्रणा बसविण्याचा सल्लाही त्यात देण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा परिसरात सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी शासनातर्फे एकसदस्यीय समिती नाशिकमध्ये पाठविण्यात आली होती. त्यांनी तब्बल २५ दिवस या भागांमध्ये भेटी देत काही निष्कर्ष त्या अहवालात नोंदविले आहेत. त्यानुसार नाशिक हा धरणांचा जिल्हा असून, त्यात अनेक नद्या वाहतात. अप्पर गोदावरीमुळे नाशिक जिल्ह्याचे क्षेत्र प्रभावित झाले असे समजले तरी काही ठरावीक गावांमध्ये हे धक्के वारंवार का बसतात हा सूक्ष्म अभ्यासाचा विषय असल्याचे त्यात म्हटले आहे.
हेही वाचा >>...तोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री मीच, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
जिऑलॉजिकल सर्व्हे नागपूर विभागाचा
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगणा, दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील रहिवाशांना २४ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान जाणवलेल्या सौम्य भूकंपाच्या घटनांसंदर्भात क्षेत्रीय तपासणी करून हा अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा भूकंप जोखीम श्रेणी ३ मध्ये येतो, म्हणजे मध्यम स्वरूपाच्या भूकंपाचा येथे थोका आहे. गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये मोठे भूकंप झाले नसले तरी त्यासाठी आधुनिक यंत्रणा कार्यरत करण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.
अहवालात ६८ निरीक्षणे
या अहवालात एकूण ६८ निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यात कच्ची घरे असतील तिथे जास्त धोका आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी. अशी घरे, वस्त्या शोधून त्यांना योग्य दिशा देण्यात यावी.
जिल्हा प्रशासनाने भूकंप आपत्ती तयारीसाठी योग्य आणि दीर्घकालीन योजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे. हे भाग भूकंप क्षेत्र-३ मध्ये येतात. त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या भूकंपाला सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार राहण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे.
काय असते तिसऱ्या क्षेत्राची मर्यादा?
भूकंप क्षेत्र ३ मध्ये स्केलनुसार ६ तीव्रतेपर्यंत जमिनीच्या हादऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरी संरचना (खाजगी व सार्वजनिक मालमत्ता) भूकंपसुरक्षित असाव्यात. त्यासाठी नवीन नागरी संरचनांचे बांधकाम मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावे.
विद्यमान आणि भविष्यातील सर्व इमारती भूकंपरोधक बनविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.