नाशिक : पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनंतर परिसरात तणाव
By Admin | Published: October 9, 2016 01:42 AM2016-10-09T01:42:26+5:302016-10-09T11:34:30+5:30
तळेगाव येथे पिडितेला भेटण्यासाठी आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीवर संतप्त जमावाने चप्पल फेकत आपला निशेद्ध नोंदवला तर तळेगाव पोलीस स्थानकाचे डी आय जी यांच्या मोटारीवरही जमावाकडून दगडफेक
ऑनलाइन लोकमत
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशिरा त्र्यंबक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांकडून अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे व घोटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव (अंजनेरी) येथे एका अल्पवयीन मुलाने शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. एका निर्जन कार्यालयामध्ये त्याने हे कृत्य केले. यासंदर्भात त्र्यंबक पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी धाव घेतली. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी तळेगाव अंजनेरी फाट्यावर दगडफेक केली. त्यापाठोपाठ वाडीवऱ्हे, घोटी येथेही रास्तारोको करण्यात आले.
नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
पोलिसांनी संशयित व पीडितेला तपासणीसाठी पाठविले. जिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टाराकडून पीडित मुलीची तपासणी करावी, यासाठी तिच्या नातेवाईकांनी आग्रह धरला. मात्र रुग्णालयात महिला डॉक्टर नसल्याने ठिय्या आंदोलन केले.
मुंबई- नाशिक मार्गावरील वाहतूक ठप्प
संतप्त गावक-यांनी अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे व घोटी येथे रास्तारोको आंदोलन केल्यामुळे मुंबई- नाशिक मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरु झाली.
अल्पवयीन मुलगी अत्याचारप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.
- अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक