नाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराकडून बलात्कार; नराधमाला काही तासांत बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:40 AM2021-09-29T09:40:35+5:302021-09-29T09:47:43+5:30
या घटनेनंतर सिडकोसह शहर व परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नाशिक: डोंबिवलीतील बलात्काराची घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पॅरोलवर सुटलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत तेथील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा नितीन अशोक पवार याला पोलिसांनी सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर सिडकोसह शहर व परिसरात भीतीचे वातावरण आहे. सोमवारी ब्यूटी पार्लरमध्ये संशयित नितीन सुभाष पवार (३२) हा बळजबरीने शिरला. त्याने चाकूचा धाक दाखवून तेथील एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादित म्हटले आहे. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सराईत गुन्हेगार जो पॅरोलवर बाहेर असताना गुन्हा करून फरार होतो आणि पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच परिमंडळ अधिकाऱ्यांचा वचक गुन्हेगारांवर नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सर्व शहानिशा करून सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. या फरार संशयित आरोपीचा अखेर काही तासात लागला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.