नाशिक बनले ‘फॉगसिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:38+5:302020-12-16T04:31:38+5:30
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने ...
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता अन् वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपासूनच शहरासह जिल्ह्यात धुके दाटण्यास सुरुवात झाली होती. तत्पूर्वी रात्री नऊ वाजतापासून शहरात दवबिंदूंचा वर्षाव होत होता. तो पहाटेपर्यंत सुरूच होता. पहाटे अचानक धुक्यात प्रचंड वाढ होऊ लागली आणि शहर जणू धुक्यात गडप झाले होते. सकाळी साडेआठ वाजता पेठरोडवरील हवामान केंद्राकडून ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली. सकाळी दहा वाजतानंतर शहरासह उपनगरांमध्येही सूर्यदर्शन घडले. यामुळे सायंकाळपर्यंत आर्द्रतेचे प्रमाण थेट ७६ टक्क्यांवर आले होते, तसेच कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ढगाळ हवामान कमी झाल्याने शहराचे कमी झालेले कमाल तापमान वाढण्यास मदत झाली. तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा थेट २३ अंशापर्यंत खाली घसरला होता आणि वातावरणातील आर्द्रतेचेही प्रमाण सकाळी ९० अन् सायंकाळच्या वेळी ८०च्या आसपास राहत होते. पावसाच्या सरी, वातावरणात वाढलेला गारठा अन् ढगाळ हवामान अशा विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागला होता.
--इन्फो--
आर्द्रतेने गाठला उच्चांक
नाशिकमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून सकाळच्या सुमारास आर्द्रतेचे प्रमाण वाढते होते. १२ तारखेपासून सकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढतच गेले. ८१ टक्क्यांपासून मंगळवारपर्यंत आर्द्रता थेट ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. यामुळे शहरात प्रचंड धुके पसरले होते.
---इन्फो--
वर्षनिहाय डिसेंबरमधील निचांकी तापमान असे...
२०२०- १०.६
२०१९ - ११.४
२०१८ - ५.१
२०१७ - ७.६
२०१६ - ७.५
२०१५ - ५.४
२०१४ - ६.१
२०१३ - ६.५
२०१२ - ६.२
----इन्फो---
महाबळेश्वरइतकाच नाशकाचा घसरला पारा
मंगळवारी राज्यात महाबळेश्वर अन् नाशिकला किमान तापमानाचा पारा १५.४ अंशापर्यंत खाली घसरला. राज्यात मंगळवारी केवळ या दोन शहरांमध्येच थंडीचा कडाका जाणवला. नाशिकनंतर औरंगाबादेत कमी किमान तापमान मोजले गेले. नाशिक फॉगसिटीसोबत कुलसिटीदेखील ठरत आहे.
-----कोट---
हिवाळा ऋतु अन् किमान तापमानात होणारी घट अन् हवेतील बाष्प व आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे अचानक धुके वाढले. रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या सरींमुळेही धुक्याला निमंत्रण मिळाले. सूर्यदर्शन घडल्यामुळे ढग वितळू लागले आहे. जसेजसे आकाश निरभ्र होत जाईल, तशी थंडीची तीव्रता यापुढे अधिक वाढत जाणार आहे. डिसेंबरअखेरीस नाशिक शहर व निफाड, मालेगावात किमान तापमानाचा पारा ५अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.
-सुनील काळभोर, हवामान तज्ज्ञ, नाशिक केंद्र प्रमुख.