नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

By अझहर शेख | Published: July 3, 2024 02:09 PM2024-07-03T14:09:52+5:302024-07-03T14:10:22+5:30

पूर्ववैमनस्यातून ही जाळपोळ करण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले.

Nashik bikes of criminal brothers were brought to Chowk and set on fire | नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

संदीप झिरवाळ

नाशिक : मखमलाबाद रोडवरील स्वामी विवेकानंदनगर येथे बुधवारी (दि. ३) पहाटेच्या सुमारास मोक्काच्या गुन्ह्यातील तसेच तडीपार करण्यात आलेल्या दोघा तडीपार गुन्हेगारांच्या दुचाकी अज्ञात इसमांनी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून ही जाळपोळ करण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. दुचाकी जाळपोळ करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

सराईत गुन्हेगार संशयित गणेश बाबूराव धात्रक व सोनू बाबूराव धात्रक या भावंडांच्या दुचाकी पेटविल्या. या घटनेत दोन्ही दुचाकी पूर्णत: भस्मसात झाल्या. पहाटेच्या सुमारास या दुचाकी भर चौकात संशयितांनी ओढून पेटवून पळ काढला. मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगणारा संशयित गणेश व पंचवटी पोलिसांकडून शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सोनू धात्रक यांच्या पल्सर व एफ झेड दुचाकी इरिगेशन कॉलनीमध्ये बहीण राहत असलेल्या अपार्टमेंटच्या वाहन तळावर उभ्या केलेल्या होत्या. बुधवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात संशयितांनी या दुचाकी वाहन तळावरून ओढून स्वामी विवेकानंदनगरच्या भर चौकात आणून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्ववैमनस्यातून किंवा मागील भांडणाचा कोणीतरी वचपा काढण्यासाठी सराईत गुन्हेगार भावंडांच्या दुचाकी पेटविल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ही घटना सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरल्याने कोणीतरी वाहनांचे टायर्स जाळले असावे, असे समजून नागरिकांनी सुरूवातीस दुर्लक्ष केले. आग विझल्यानंतर घटनास्थळी केवळ दुचाकींचे सांगाडे शिल्लक राहिले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दुचाकी भस्मसात झालेल्या होत्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुचाकी पेटविणाऱ्या गुन्हेगारांचा शाेध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे आव्हान म्हसरूळ पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

Web Title: Nashik bikes of criminal brothers were brought to Chowk and set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.