नाशिकमध्ये भाजप-सेनेत ‘सामना’ रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:25 AM2019-11-22T02:25:23+5:302019-11-22T02:25:42+5:30
भाजपचे बहुमत असतानाही त्यांचे नगरसेवक फोडूून काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने चमत्कार घडविण्याची शिवसेनेची तयारी आहे.
नाशिक : महापौरपदासाठी भाजप व शिवसेनेत सरळ ‘सामना’ होत आहे. भाजपचे बहुमत असतानाही त्यांचे नगरसेवक फोडूून काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने चमत्कार घडविण्याची शिवसेनेची तयारी आहे, तर भाजपनेदेखील विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने प्रत्यक्ष काय घडणार हे सभागृहात ठरणार आहे.
राज्यातील सत्ता समीकरणांचा परिणाम नाशिकमध्ये जाणवत आहे. शिवसेनेने पुढाकार घेऊन येथे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या मदतीने महाशिवआघाडी साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधकांनीदेखील शिवसेनेला बऱ्यापैकी साथ दिली आहे. भाजपसोडून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले भाजपचे १0 नगरसेवक उघडपणे फुटले असून, त्यांनी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात परस्पर अर्ज दाखल करणे तसेच सहलीला न जाण्याचे प्रकार केले. मनसेच्या पाच नगरसेवकांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज ठाकरे शुक्रवारी ऐनवेळी निर्णय घोषित करणार आहेत. महापौरपदासाठी भाजपात दिनकर आढाव, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी तर शिवसेनेत अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांच्यात रस्सीखेच आहे.
एकूण - १२२ (२ जागा रिक्त)
भाजप - ६५ । शिवसेना ३४
काँग्रेस - ६ । राष्ट्रवादी- ६
मनसे - ५ । अपक्ष - ३
रिपाइं (आठवले गट) - १