बॉसनं १२ कर्मचाऱ्यांना दिली महिंद्राची नवी कोरी कार; कुटुंबाला बसला सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:52 AM2022-07-15T11:52:08+5:302022-07-15T11:56:40+5:30
महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे.
नाशिक - शहरातील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाचवेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह इतरांसाठीही आनंद आणि प्रेरणादायी ठरली आहे.
दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
यासंदर्भात आव्हाड म्हणाले की, "माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज ७५० लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला १०० दिपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू आणि एकूणच या माध्यमातून नाशिक मोठं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचवणं, तसेच वर्तुळ व्यवसाय धोरण वापरून नाशिकचा पैसा हा नाशिक मध्येच कसा राहील या साठी मी नेहमी प्रयत्नशील असतो असं त्यांनी सांगितले.
महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. नाशिकमध्येच निर्मिती होणाऱ्या महिंद्रा कारचीच निवड करण्यात आली. म्हणजेच, नाशिकच्या डेअरी पॉवर कंपनीने नाशिकमध्येच उत्पादित होणाऱ्या महिंद्रा कंपनीची कार नाशिकच्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. महिंद्राचे डीलर असलेल्या जितेंद्र ऑटोमोटिव्ह या शोरुममध्ये छोटेखानी कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला. त्यात या कर्मचाऱ्यांना ही कार गिफ्ट देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांमध्ये प्रचंड आनंद आणि समाधानाचे वातावरण होते.
गुरुपोर्णिमेनिमित्त नाशिक येथे मालकाने कर्मचाऱ्यांना दिली नवी कार #Nashikpic.twitter.com/a2SUIte1eV
— Lokmat (@lokmat) July 15, 2022
‘महिंद्रा’च का?
महिंद्रा कंपनी नाशिकमध्ये आल्यानंतर हजारो हातांना काम मिळाले आहे व त्यामुळे खऱ्या अर्थाने नाशिकची भाग्यरेषा समृद्ध झाली आहे. महिंद्रासारखी एक कंपनी जर आपल्या नाशिकला एवढं देऊ शकते तर आपण एक नाशिककर म्हणून त्या कंपनीला देखील काही देणं लागतो या भावनेतून आव्हाड यांनी नाशिक महिंद्राची निवड केली आहे, तसेच आपल्या नाशिकचा पैसा हा नाशिकमध्येच राहावा आणि त्याचा नाशिकच्या लोकांना फायदा व्हावा हा देखील यामागचा एक महत्वाचा हेतू आहे. या आधी देखील आव्हाड यांनी डेअरी पॉवरसाठी महिंद्रा कंपनीची तब्बल १२३ कमर्शियल वाहने घेतली असून नाशिकच्या जितेंद्र मोटर्स मुळे महिंद्रा कंपनीने आजमितीस नाशिकमध्ये करोडो रुपयांची उलाढाल केली आहे आणि यामुळे नक्कीच नाशिकच्या अर्थकारणात नक्कीच मोठी भर पडली आहे.