Nashik: पंचवटी परिसरात पोलीस पुत्राचा पहाटे निर्घृण खून
By अझहर शेख | Published: August 21, 2024 03:00 PM2024-08-21T15:00:52+5:302024-08-21T15:01:51+5:30
Nashik: दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्यापहाटे निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.
- अझहर शेख
नाशिक - दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्यापहाटे निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२१) सकाळी सात वाजता उघडकीस आली. गगन प्रवीण कोकाटे (२४, रा.राधेश्याम निवास, वृंदावननगर, म्हसरूळ) असे मृत्यूमूखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिासांनी सांगितले. गगनला जीवे ठार मारल्यानंतर हल्लेखोर हे फरार झाले असून पंचवटी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके त्यांचा शोध घेत आहेत. दिवस उजाडताच घडलेल्या खूनाच्या घटनेने मेरी-म्हसरूळसह पंचवटी परिसर हादरला.
कॉलनी रस्त्यावर गगनवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. सकाळी जेव्हा ही बाब परिसरात जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच पंचवटील, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलीस, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते.
बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमाराला गगनचा मृतदेह कॉलनी रस्त्यावर आढळून आला. त्याचे वडील प्रविण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३नुसार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
दोन महिन्यांपुर्वीच वडील सेवानिवृत्त
शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१मध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरिक्षक प्रविण शहाजी कोकाटे हे जून महिन्यात सेवानिवृत्त झाले आहे.