नाशिकच्या उद्योजकाची गोळी झाडून घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 02:06 AM2021-04-08T02:06:48+5:302021-04-08T02:07:14+5:30
सटाणा शहरानजीक असलेल्या यशवंतनगर जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सटाणा : शहरानजीक असलेल्या यशवंतनगर जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बुधवारी (दि. ७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे हे मोठे उद्योजक असल्याची माहिती मिळते आहे. नंदलाल शिंदे हे स्वत:च्या स्कोडा रॅपिड कारमधून (क्र. एमएच १५ एफटी ०१३३)) सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाण्याजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी मावस भावाला मोबाइलद्वारे कळविले होते. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर नातेवाईक ताहाराबादजवळ होते. मावसभाऊ व नातेवाईक जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर पोहोचले असता नंदलाल शिंदे हे स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
सिडको : नंदलाल शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा सिडकोतील मोरवाडी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगर भागात शिंदे कुटुंबासह राहतात. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे .शिवसेनेचे पदाधिकारी मामा ठाकरे यांचे ते भाचे होत. नंदू शिंदे हे मूळचे समोडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील असून व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून ते नाशिक येथे स्थायिक आहेत. त्यांची सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनी आहे. राजकारणात ते आधी मनसेनंतर भाजपमध्ये कार्यरत होते. महिन्द्र ॲण्ड महिन्द्र कंपनीचे ते माजी पदाधिकारी, तर निमा या उद्योजकांच्या संघटनेवर संचालकपदावरही होते.
रिव्हॉल्व्हर ताब्यात
पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून, पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.