Nashik: कार चालकाला गुंगीचे औषध देऊन लुटणारा जेरबंद
By नामदेव भोर | Published: May 11, 2023 03:42 PM2023-05-11T15:42:50+5:302023-05-11T15:43:05+5:30
Nashik: मुंबईहून नाशिकला येणाऱ्या प्रवाशाने उबेर टॅक्सी चालकाला एका प्रवाशाने पाण्यातून गुंगीचे औषध देवून लूटल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली होती.
- नामदेव भोर
नाशिक - मुंबईहून नाशिकला येणाऱ्या प्रवाशाने उबेर टॅक्सी चालकाला एका प्रवाशाने पाण्यातून गुंगीचे औषध देवून लूटल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली होती. यासंशयित शुभम उर्फ स्वदेश दीपर नागपुरे (२५. रा. नायरा पेट्रोल पंपच्या मागे,दिंडोरीरोड, म्हसरूळ ) नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनीट एकच्या पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) राहूल प्रसाद शिवनंदन प्रसाद (२४, रा. तीन हात नाका, ठाणे, मूळ तुईओ- बरकठ्ठा, हजारीबाग, झारखंड) हा स्विफ्ट कार उबेर कंपनीची टॅक्सी म्हणून चालवत असताना मुंबई येथून एका प्रवाशानने नाशिकला सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्याने प्रसादला त्याच्या नकळत पाण्यातून गुंगीचे औषध देऊन त्याच्या खिशातील पैशाचे पाकिट व मोबाईल फोन चोरून पळ काढला. प्रसादला शुद्ध आल्यानंतर त्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार कथन करीत संशयित प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट एक व दोनच्या पथकाला सोपविण्यात आला असताना गुन्हे शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली.
पोलिस हवालदार सुरेश माळोदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे युनीट एकच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिसउपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागूल पोलिस हवालदार मुख्तार शेख यांनी नाशिकरोड बस स्थान परिसरात सापळा रचून कारवाई करीत शुभम उर्फ स्वदेश दीपक नागपुरे(२५, रा. जास्मीन सोसायटी, आसनगाव,ठाणे ,मूळ रा.दिंडोरी रोड, नायरा पेट्रोलपंपमागे ) याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आढळून आला असून संशयित नागपूरे याने चालकाला गुंगी देवून लूटल्याची कबूलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.