नाशिक चिंब
By admin | Published: July 10, 2016 11:33 PM2016-07-10T23:33:19+5:302016-07-10T23:35:24+5:30
गोदावरीला पूर : नदीकाठच्या गावांना ‘हाय अलर्ट’; दारणा, बाणगंगा, म्हाळुंगी नद्यांना पूर
नाशिक : दोन वर्षांनंतर नाशिककरांनी प्रथमच रविवारी (दि.१०) दुपारी गोदावरीचा पूर अनुभवला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने रविवारी पहाटे जोर धरल्यामुळे गोदावरीचा जलस्तर उंचावला. पूरनियंत्रण व जिल्हा आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारपासून शहरात पावसाची संततधार सुरू असून, शनिवारी दुपारपासून पाण्याचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढला आहे. रविवारी पहाटेपासून दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पुलाखाली असलेल्या मोजपट्टीवरील १८४८ मीटरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली होती. त्यामुळे नदीपात्रातून दुपारी तीन वाजेनंतर सुमारे १४ हजार क्यूसेक पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याची माहिती पूरनियंत्रण विभागाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुपारी एक वाजेपासूनच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीच्या पाण्याची पातळी दुपारच्या सुमारास अचानकपणे वाढल्याने गोदाघाटावरील टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच गोदावरी काठालगत असलेल्या मोटारीही या पुरात बुडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोदाकाठालगतच्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी गंगापूर धरणात ३४ टक्के जलसाठा
होता. शनिवारी पहाटे सहा वाजेपासून
तर रविवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात
१०६ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. दिवसभर झालेल्या पावसामुळे या जलसाठ्यात नक्कीच वाढ झाली असून, सोमवारी (दि.११) सकाळी निश्चित वाढ समजणार असल्याची माहिती गंगापूर धरणावरील शाखा अभियंता प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव तालुका वगळता अन्य सर्व भागांमध्ये पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
दुपारपर्यंत गोदाकाठावरील आठ दुचाकी, तीन चारचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच दोन नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. (प्रतिनिधी)