पहिल्याच पावसात नाशिक शहर तुंबले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 07:03 PM2019-06-27T19:03:46+5:302019-06-27T19:07:12+5:30
बुधवारी सायंकाळी पाऊण तास शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी पुन्हा दुपारी अडीच ते सव्वातीन वाजेपर्यंत शहरातील गोदाघाट, जुने नाशिक, गंगापूररोड, शरणपूररोड, जुने सीबीएस, मुंबईनाका, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, अशोकामार्ग, द्वारका, गांधीनगर, टाकळीरोड या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
नाशिक : शहराच्या मध्यवर्ती परिसरात गुरुवारी (दि.२७) दुपारी अर्धा ते पाऊण तासात दमदार पावसाने हजेरी लावली. हंगामातील हा सर्वाधिक जोर असलेल्या पहिल्याच पावसात नाशिक महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे पीतळ उघडे पडले. मनपाच्या गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहिल्याने ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहराच्या मध्यवर्ती परिसरात पावसाचा जोर कमालीचा होता; मात्र पंचवटीसह नाशिकरोड भागात त्या तुलनेत पाऊस अत्यल्प झाला.
हवामान खात्याकडून पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही गडगडाटी ढगांमधून दमदार पावसाचा इशारा येत्या रविवारपर्यंत (दि.३०) देण्यात आला आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाऊण तास शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी पुन्हा दुपारी अडीच ते सव्वातीन वाजेपर्यंत शहरातील गोदाघाट, जुने नाशिक, गंगापूररोड, शरणपूररोड, जुने सीबीएस, मुंबईनाका, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, अशोकामार्ग, द्वारका, गांधीनगर, टाकळीरोड या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
पहिल्याच जोरदार पावसाने मनपाच्या पावसाळी भुयारी गटारींची अवस्था नागरिकांपुढे आली. परिणामी गोदाकाठावर गटारींच्या चेंबरचे कारंजे नागरिकांना दृष्टीस पडले. शहरातील सखल भाग म्हणून ओळख असलेल्या जुनी बाजारपेठ दहीपूल, हुंडीवाला लेन, सराफबाजार, राजेबहाद्दर लेन हा परिसर निम्मा पाण्याखाली बुडाला होता. नागरिकांची वाहने, दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यावसायिकांचे हाल झाले. महापालिकेच्या पावसाळी गटारी, भूमिगत गटारींचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात सर्वत्र कमी -अधिक प्रमाणात पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासह महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यापुढेही पाण्याचे तळे साचले होते. याकडे महापालिका प्रशासनक डून लक्ष पुरविले जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
--इन्फो--
वाहतूक विस्कळीत
दुपारी अडीच वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील मुंबईनाका, गंगापूररोड, रविवार कारंजा, द्वारका या भागांत वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईनाका, भाभानगर या भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच राजीव गांधी भवन, टिळकवाडी परिसरात रस्त्यांवर पाण्याचे तळे साचल्याने शरणपूररोडवरील वाहतूक टिळकवाडी सिग्नल ते कॅनडा कॉर्नरपर्यंत विस्कळीत झाली होती.