नाशिक शहरातही आढळतात कुपोषित बालके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:42 AM2019-06-25T01:42:25+5:302019-06-25T01:42:48+5:30
सामान्यत: दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या नाशिक शहरातही कुपोषणग्रस्त बालके आढळत असून, चालू वर्षी सर्वेक्षणात सहा बालके आढळली आहेत.
नाशिक : सामान्यत: दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या नाशिक शहरातही कुपोषणग्रस्त बालके आढळत असून, चालू वर्षी सर्वेक्षणात सहा बालके आढळली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अशाप्रकारच्या तपासणीत सहा ते सात बालके आढळत असून, त्यामुळे शहरी भागातही कुपोषण असण्यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे याविषयाकडेदेखील लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण विशेषत: आदिवासी भागात दुर्गम भाग असल्याने त्याठिकाणी मूलभूत सुविधा नसतात. विशेषत: रोजी रोटीचा प्रश्न असल्याने त्यासाठी काम करूनही पोटभर अन्न न मिळणारा वर्ग असतो. अशा ठिकाणी पुरेसे पोषण घटक नसल्याने कुपोषण होत असते. त्या तुलनेत शहरी भागात अगदी झोपडपट्टी क्षेत्र असले तरी त्याठिकाणी रस्ते पाणी आणि अन्य सुविधा तर असतात. परंतु मुख्य म्हणजे रोजगारदेखील असतो. परंतु तरीही कुपोषणाची समस्या शहरी भागात अधोरेखित होते आहे हे विशेष !
नाशिक शहरात सुमारे अडीच लाख लोक हे झोपडपट्टीत राहतात. महापालिकेने त्यांच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. सध्या २७६ अंगणवाड्या सुरू असून, त्यात सुमारे दहा हजार मुले येतात. मात्र, महापालिकेकडून त्यांची वैद्यकीय तपासणी होत नाही तर जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत ती केली जाते. रुग्णालयाचे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अंगणवाडीत जाऊन तेथील मुलांचे वजन आणि उंची तपासत असते.
पोषण आहार देऊनही कुपोषण
महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्येच बचत गटांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २५ लाख रुपये खर्च होतात. शेंगदाणा लाडू, केळी, मटकी उसळ, गव्हाची लापशी आणि राजगिरा लाडू अशाप्रकारचे पोषण आहारचे वेळापत्रक आहे तरीही दर वर्षी पाच ते सहा कुपोषित बालके आढळतात हे विशेष होय. मनपाच्या अंगणवाड्यांमध्ये सेविका प्रशिक्षित नसतात. तसेच खाऊचा कोपरा किंवा तत्सम सुविधा नसतात.
मालेगाव शहरात कुपोषणाची स्थिती गंभीर
मालेगाव शहर व तालुक्यातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी मालेगाव शहर एकात्मिक बालविकास प्रकल्प, मालेगाव तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प व रावळगाव एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यान्वित आहेत.
कुपोषित बालकांची सर्वाधिक संख्या शहर बालविकास प्रकल्पात आढळून येत आहे. शहर तालुक्यात तीन प्रकल्प कार्यान्वित असतानादेखील कुपोषणाची संख्या कमी होताना दिसत नाही.
मालेगाव तालुका (ग्रामीण) प्रकल्पात तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५ आहे, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८९ आहे. रावळगाव बालविकास प्रकल्पात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ७ आहे, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ३९ आहे. शहरी भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
शहरात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४८ आहे, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ३१२ आहे. शहरात गेल्या दीड महिन्यात ९२ बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाला आहे.