नाशिक शहर रॉकेल विक्रेत्यांचे साखळी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:17 AM2017-11-11T01:17:22+5:302017-11-11T01:17:57+5:30
धान्य वितरण अधिकारी नाशिक कार्यालयातील मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर रॉकेल विक्रेता संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नाशिकरोड : धान्य वितरण अधिकारी नाशिक कार्यालयातील मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर रॉकेल विक्रेता संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे नाशिक शहर रॉकेल विक्रेता संघाचे पदाधिकारी साखळी उपोषणास बसले आहे. धान्य वितरण अधिकारी नाशिक यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले सक्तीच्या रजेवर गेल्या असता गेल्या चार महिन्यांपासून रॉकेल वितरणात मोठ्या प्रमाणात बदल करून काही ठराविक रॉकेल परवानाधारकांच्या रॉकेल कोठ्यात वाढ करून दिली आहे. २५ ते ५० लिटर मासिक रॉकेल वितरणासाठी असलेल्या रॉकेल परवानाधारकांना आर्थिक व मानसिक त्रास देण्यात येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. साखळी उपोषणास नाशिक शहर रॉकेल विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गोहाड, पांडुरंग गाडे, सूर्यकांत तांबे, किशोर सहाणे, मोहन क्षत्रिय, भीमचंद चंद्रमोरे, उत्तमचंद संघवी आदी बसले आहेत.