नाशिक शहर पोलीस दलाचे ‘गुगल’, ‘मॅक्स’ ठरले चॅम्पियन; सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई
By अझहर शेख | Published: September 10, 2023 05:06 PM2023-09-10T17:06:34+5:302023-09-10T17:06:52+5:30
आपल्या चमकदार कामगिरीद्वारे स्पर्धेच्या परिक्षकांची मने जिंकून मॅक्सने सुवर्ण तर गुगलने रौप्य पदकावर नाव कोरले.
नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकातील तरबेज श्वान म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि गुन्हेगारांनाही ज्यांचा धाक वाटतो अशा ‘गुगल’ व ‘मॅक्स’ या दोन्ही श्वानांनी नाशिकपोलिसांचा झेंडा राज्यस्तरावर उंचावला. आपल्या चमकदार कामगिरीद्वारे स्पर्धेच्या परिक्षकांची मने जिंकून मॅक्सने सुवर्ण तर गुगलने रौप्य पदकावर नाव कोरले.
पुण्यातील रामटेकडी येथे राज्याच्या पोलीस दलातील श्वानांसाठी १८व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळावा आठवडाभर सुरू होता. स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि.९) महासंचालक रजनीश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आठवडाभर रंगलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांच्या पोलिस दलातील एकापेक्षा एक सरस असे प्रशिक्षित श्वानांनी त्यांच्या हस्तकांसह सहभाग घेतला होता. सुमारे ५० श्वान या स्पर्धेत स्पर्धक म्हणून आपले कौशल्य दाखवले.
स्पर्धेतील विविध काठिण्य टप्पे सहजरित्या पार करत प्रशिक्षकांची मने जींकून गुन्हेगाराचा काही मिनिटांतच छडा लावणाऱ्या पाच वर्षीय डॉबरमॅन गुगल श्वान रौप्य पदकाचा मानकरी ठरला. यापुर्वी २०१९साली त्याने कांस्यपदक मिळविले होते. त्या तुलनेत यंदा गुगलची कामगिरी सरस ठरली. तसेच अमली पदार्थ शोधक म्हणून ख्याती असलेल्या सहा वर्षाच्या जर्मन शेफर्ड मॅक्स श्वानाने नेहमीप्रमाणे आपले कसब वापरून दडवून ठेवलेले अमली पदार्थ निर्धारित वेळेत लीलयापणे हुंगले आणि सुवर्णपदक पटकावत कामगिरीत सातत्य ठेवले. यापुर्वी २०१७ ते २०१९सालापर्यंत मॅक्स सलग सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.
म्हणून नाशिक पोलिसांना अजिंक्यपद!
या दोन्ही श्वानांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे नाशिक शहर पोलिस श्वान पथकाला स्पर्धेचे अजिंक्यपद प्रदान करण्यात आले. रजनीश सेठ यांच्या हस्ते गुगलचे हस्तक गणेश कोंडे, अरुण चव्हाण व मॅक्सचे हस्तक विलास पवार, सुधीर देसाई यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतीचषक देऊन गौरविण्यात आले. यापुर्वी फेब्रुवारी महिन्यात भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातसुद्धा गुगल, मॅक्स या श्वानांनी चमकदार कामगिरी करत टॉप-१०मध्ये स्थान राखले होते.