नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर

By अझहर शेख | Published: April 8, 2023 05:27 PM2023-04-08T17:27:47+5:302023-04-08T17:28:26+5:30

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती.

Nashik city police 'speed' will increase; 21 new cars were added to the fleet | नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर

नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर

googlenewsNext

नाशिक : शहर पोलिस दलाच्या ताफ्यात नवीन २१ मोटारींची शनिवारी (दि.८) भर पडली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाेलिस आयुक्तालयाला मिळालेल्या निधीतून नव्या कोऱ्या कारची खरेदी करण्यात आली. या मोटारी शनिवारी पोलिस सेवेत दाखल झाल्या. यामुळे आता पोलिस दलाची ताकद अधिक वाढली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ अधिक कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. आयुक्तालयाला नव्या काही वाहनांची निकड प्रकर्षाने जाणवत होती. वाहनांची संख्या कमी असल्यामुळे पोलिस गस्तीवरदेखील त्याचा परिणाम होत होता. परिणामी शहरातील कायदासुव्यवस्था राखण्यात ‘अडथळे’ येत होते. शहरातील १४ पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांच्या पथकांनाही वाहनांची गरज भासते. बहुतांश वाहने जुनी झाल्यामुळे त्यांचा मोठा घसारा झाला असून त्यांच्या देखभालदुरूस्तीचा आर्थिक खर्चाचा बोझा आयुक्तालयाच्या तिजोरीवर पडत होता. यामुळे नव्या वाहनांची मोठी गरज निर्माण झाली होती.

तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून १७ वाहनांची मागणी केली होती. विद्यमान पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाठपुरावा करत त्यामध्ये आणखी चार वाहनांची भर टाकली. अखेर जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळाल्याने नव्या २१ मोटारी पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. शनिवारी (दि.८) दुपारी बारा वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा या वाहनांच्या ताफ्याला दाखविण्यात आला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव आदि उपस्थित होते.

पोलिस ठाण्यांची अडचण सुटणार!

नाशिक पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांच्याप्रमुखांना ही वाहने दिली जाणार आहे. यामुळे पोलिस निरिक्षकांकडे यापुर्वीच्या ‘इरटिगा सी आर मोबाइल’ गस्ती पथकाकडे येतील. या नव्या वाहनांमध्ये काही इरटिगा कार तर काही महिंद्राच्या टीयुव्ही कार आहेत. ज्या पोलिस ठाण्यांकडे वाहनांची संख्य अपुरी आहे, त्यांना प्राधान्यक्रमाने वाहने दिली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच शहर वाहतुक शाखा, गुन्हे शाखांच्या विविध पथकांनाही यामधून वाहने मिळणार आहेत.
 

Web Title: Nashik city police 'speed' will increase; 21 new cars were added to the fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.