समृद्धी महामार्गाला नाशिक शहर होणार कनेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:53+5:302021-09-07T04:19:53+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील वाडीवऱ्हे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र महामार्गावर मौजे भरवीर (कवडदरा फाट्यापर्यंत) हा प्रस्तावित ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील वाडीवऱ्हे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र महामार्गावर मौजे भरवीर (कवडदरा फाट्यापर्यंत) हा प्रस्तावित इंटरचेंज मार्ग तयार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीच्या २५ ऑगस्टला झालेल्या बैठकीत या मार्गास मान्यता देण्यात आली. त्याचा शासन निर्णय सोमवारी (दि. ६) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे. दुपदरी रस्ता तया करण्यासाठी याच महामंडळाला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जोड रस्त्यासाठी २४९ कोटी ६७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या मार्गाची पायाभरणी सुरू असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये क्रेडाई मेट्रोच्या कार्यक्रमात समृद्धी महामार्गाला नाशिक विशेष लेनद्वारे जोडण्याची घोषणा केली होती. सुमारे सोळा किलोमीटरचा हा मार्ग असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतरही समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पुढे नेण्यात आले आहे. नाशिक हे कृषी व औद्योगिक केंद्र आहे. तसेच ते समृद्धीच्या विकासाचे केंद्र व्हावे यासाठी २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती. त्याला अखेरीस मान्यता देण्यात आली आहे.