Nashik: स्वच्छ गोदावरी अन प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी अभियानाचा आज शुभारंभ, राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
By Suyog.joshi | Published: October 2, 2023 10:19 AM2023-10-02T10:19:59+5:302023-10-02T10:20:28+5:30
Nashik News: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे.
- सुयोग जोशी
नाशिक - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे. तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या दरम्यान शंकराचार्य संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे श्री एम यांचे ‘अध्यात्म आणि सेवा’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद होणार आहे. मंगळवार, दिनांक ३ रोजी सकाळी ७.३० वाजता ब्रह्मगिरीवरील कुंडांचे पुनरुज्जीवन, माती अडवा पाणी जिरवा संकल्पना व प्लास्टिकमुक्त परिसर या चळवळीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या वेळी माझे झाड (माय ट्री) या संकल्पनेचा शुभारंभदेखील करण्यात येणार आहे.
शहरातील पर्यावरण कसे आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वच्छ हवा, नितळ पाणी, हिरवीगार वनराई, डोंगर असतील तर शहरातील पर्यटन चांगले असते, दळणवळण चांगले होते आणि पर्यायाने शहराचा विकास होतो. निसर्गाची सेवा हीच मानवाची सेवा, असे मानणाऱ्या समाजसेवींच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या ‘अविरल गोदावरी’ अंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर क्षेत्री पर्यावरणीय चळवळीने आकार घेतला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून कामांचा शुभारंभ येथे २ व ३ ऑक्टोबरला होत आहे.
गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा
ब्रह्मगिरीवर जेथे गोदामाईचा उगम होतो तेथून प्रवाहाच्या दिशेने जवळपास १०८ कुंड असून त्यातील काही कुंड स्वच्छ करण्याचे काम झाले आहे. या कुंडांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जयपूर येथे झालेल्या ‘सी २०’ कॉनक्लेव्हमध्ये डॉ. राजेंद्र सिंह यांनी बनवलेला गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा सादर झाला. नदी कशी वाहती होईल, याविषयी झालेली सकारात्मक चर्चा अखंड कार्याच्या रूपाने सुरू झाली आहे.
देशव्यापी चळवळ होईल
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध डॉ. राजेंद्रसिंह यांचा मिलाफ एखाद्या चळवळीत झाला तर हा मणिकांचन योग म्हणावा लागेल. ती चळवळ नक्कीच देशव्यापी रूप धारण करून आपला एक मानदंड जगासमोर ठेवेल यात शंका नाही. या दोन्ही महानुभावांनी नाशिकची गोदावरी व त्र्यंबकेश्वरीचा ब्रह्मगिरी याप्रश्नी लक्ष घातले असून स्वच्छ गोदावरी व प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरीची हाक नाशिककरांना दिली आहे.