नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 03:24 PM2019-03-07T15:24:07+5:302019-03-07T15:31:39+5:30
नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
नाशिक : शहर-ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध कुमार जयस्वाल यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
आठवडाभरापुर्वी राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्विकारला. तत्पुर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्यांच्या जागेवर संजय बारवे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. जयस्वाल यांनी महासंचालकपदाचा पदभार स्विकारताच राज्यातील नाशिक शहरात प्रथम दाखल होऊन कायदासुव्यवस्थेचा आढावा जाणून घेला. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा करून कायदासुव्यवस्थेविषयी चर्चा केली. आगामी निवडणूक काळात शहरासह जिल्ह्यात कायदासुव्यवस्था राखण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. शहरासह संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांविषयीदेखील त्यांनी चर्चा केल्याचे समजते. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा झाली आहे. ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये राजकिय पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप तसेच अवैध धंद्यांचा बिमोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी भागातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शक सुचना करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांना देण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातदेखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महासंचालक जयस्वाल यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागील दीड महिन्यात शहरात खूनाच्या सात घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या टोळ्या जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलीस दलापुढे आहे. या बैठकीसाठी नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली बैठक तीन वाजता संपतली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी जयस्वाल यांनी कुठल्याहीप्रकारे संवाद साधला नाही. निवडणूक काळातकायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी विशेष गोपनीय बैठक त्यांनी घेत पोलीस अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या.
--
आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’
दुपारी बारा वाजेच्या सुमारास महासंचालक जयस्वाल यांची बैठक आयुक्तालयात सुरू झाली. त्यानंतर आयुक्तालयाच्या मुख्य स्वागतकक्षावरून कोणालाही इमारतीत प्रवेश दिला जात नव्हता. सर्वसामान्य नागरिकांपासून तर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही मज्जाव करण्यात आला. आयुक्तालयाच्या इमारतीसह परिसरात अघोषित संचारबंदी यावेळी पहावयास मिळाली. केवळ पोलीस कर्मचा-यांची तुरळक वर्दळ यावेळी दिसून आली. नागरिक व पत्रकारांना स्वागतकक्षाच्या उंबरठ्यावरूनच माघारी फिरावे लागले.