नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग सुकर; भुजबळांच्या निर्णयाचं गोडसेंकडून स्वागत
By संजय पाठक | Published: April 19, 2024 05:00 PM2024-04-19T17:00:21+5:302024-04-19T17:01:10+5:30
Nashik Lok sabha Election - अखेरीस नाशिकची जागा शिंदे गटाला साेडवून आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाल्याची चर्चा गुरूवारपासून सुरू झाली.
नाशिक- लोकसभा निवडणूकीत नाशिकच्या जागेसाठी असलेली चुरस अत्यंत टप्प्यात आली असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे शिंदे गटातील दावेदार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या निर्णयाचे गोडसे यांनी स्वागत केले आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकच्या जागेचा तिढा गेल्या महिनाभरापासून सुरू होता. शिंदे सेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा सुरू
असतानाच त्यात छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर भुजबळ यांना विरोध आणि समर्थन अशा प्रकारचे मतप्रवाह महायुतीत सुरू झाले होते. मात्र, या सर्व चर्चेच्या गुऱ्हाळात महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना गेल्या महिन्यात होळीच्या दरम्यान उमेदवारी दिली आणि त्यांचा प्रचार देखील सुरू झाला. मात्र, महिना उलटला तरी नाशिकचा तिढा सुटत नसल्याने सर्वत्र अस्वस्थता होती. अखेरीस ही जागा शिंदे गटाला साेडवून आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाल्याची चर्चा गुरूवारपासून सुरू झाली.
त्यातच शुक्रवारी (दि.१९) छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परीषद घेतली आणि आपली भूमिका मांडताना महायुतीच्या हितासाठी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले.आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी अशी सूचना भाजपाचे केंद्रीय नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. त्यानुसार आपण तयारझालो आणि सर्व समाजाचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला हाेता. मात्र, अमित शहा यांनी घोषीत केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी उमेदवारी घोषीत झाली नाही. आता उमेदवारीची रस्सीखेच संपविण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता लवकरच शिंदे सेनेच्या वतीने उमेदवाराची घोषणा होईल असे गोडसे यांनी सांगितले.