दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर
By Suyog.joshi | Published: April 3, 2024 01:21 PM2024-04-03T13:21:09+5:302024-04-03T13:21:54+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिककरांशी साधलेला संवाद, तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी श्री काळाराम मंदिरासह गोदावरीची केलेली आरती, शहराचा रामायणाशी असलेला संबंध यामुळे चर्चेत आलेल्या लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे. त्यात काँग्रेसचे तत्कालीन खासदार भानुदास कवडे व हेमंत गोडसे यांचा समावेश आहे.
१९६७ आणि १९७१ मध्ये दोन्ही वेळा काँग्रेसकडून भानुदास कवडे आणि २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे या दोनच खासदारांना सलग एकापेक्षा जास्त टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून मिरवता आलं आहे. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सलग दोन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भानुदास कवडे खासदार झाले. त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर भाऊराव गायकवाड यांनी निवडणूक लढवली. कवडे यांनी त्यांचा ३६ हजार ३०७ मतांनी पराभव केला.
कवडे यांना १ लाख ५५ हजार ६३२ मते मिळाली. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत कवडे यांनी भारतीय क्रांती दलाचे धैर्यशीलराव पवार यांचा तब्बल १ लाख ४५ हजार ७४१ मतांनी पराभव केला. कवडे यांना २ लाख ८ हजार ८९८ मते मिळाली. धैर्यशील पवार यांना अवघे ६३ हजार १५६ म्हणजे २२.४२ टक्के मते मिळाली होती; पण १९७७ नंतर त्यांना शिवसेनेकडून आव्हान मिळाल्याचं पाहायला मिळालं. तर काही काळ राष्ट्रवादीनंही या ठिकाणी झेंडा फडकवल्याचं दिसून आलं.
भुजबळ कुटुंबीयांना धोबीपछाड
नाशिक लोकसभा मतदारसंघातून १९९१ नंतर कुणालाही सलग दोनदा खासदार होता आलं नव्हतं; पण शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांनी २०१९ मध्ये या मतदारसंघाची ही परंपरा मोडीत काढत, २०१४ नंतर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांचा तर २०१९ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये दोन लाखांच्या आसपास, तर २०१९ मध्ये तीन लाखांच्या आसपास मतांच्या फरकानं ते विजयी झाले होते. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांनाही युतीचे उमेदवार असलेल्या गोडसे यांच्यासमोर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर २०१९ मध्येही याचीच पुनरावृत्ती झाली अन् गोडसे यांचा मोठा विजय झाला.
सहा मतदारसंघांचा समावेश
लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम याबरोबरच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्याचं राजकीय बलाबल पाहता यापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.