नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक निधीत ‘असाही’ झोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:02 PM2018-01-05T16:02:55+5:302018-01-05T16:04:22+5:30
जिल्हा दर सूचीचा फटका : पूर्ण निधी मिळतच नसल्याचा दावा
नाशिक - महापौरांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला असला तरी, प्रत्यक्ष कामांची प्राकलने तयार करताना दरसूचीचा फटका बसून मिळालेल्या निधीत कपात होत असल्याचा दावा, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. ज्या नगरसेवकांचा निधी शिल्लक राहिला असेल, त्यांना तो पुन्हा वापरायास मिळेलच असे नाही. त्यामुळे नगरसेवक निधीचा हा झोल येत्या महासभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
महापौरांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रत्येक पालिका सदस्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. कायद्याच्या भाषेत हा विकास निधी असला तरी त्याला नगरसेवक निधी म्हणूनच संबोधिले जाते. सदर निधीतून अनेक कामे नगरसेवकांनी सुचविलेली आहेत. परंतु, तांत्रिक बाबींमुळे हा ७५ लाखांचा संपूर्ण निधी सदस्यांना मिळतच नसल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केला आहे. तिदमे यांनी म्हटले आहे, निधी वापरण्यासाठी नगरसेवकांकडून प्राकलन रकमेएवढ्या रकमेचे पत्र घेण्यात येते. प्राकलन तयार करताना डी.एस.आर.रेटचा (जिल्हा दर सूची) संदर्भ घेण्यात येतो. मुळातच हा डी.एस.आर. हा स्थानिक प्रचलित दरांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे बव्हंशी ठेकेदार २५ ते ४० टक्क्यापर्यंत कमी दराने निविदा भरताना दिसतात. परंतु, नगरसेवकांनी प्राकलन रकमेनुसार दिलेला निधी संपूर्ण खर्च होत नाही. सदर काम ठेकेदाराने कमी दरात घेतले म्हणून उर्वरित रक्कम पुन्हा नगरसेवक निधीत समाविष्ट होत नाही. पालिका सदस्याचा निधी प्राकलन दरानुसारच त्याच्या मिळालेल्या निधीतून कपात होतो. डी.एस.आर. रेट जास्त असल्याने प्राकलन जास्त रकमेचे तयार होऊन त्याचा फटका पालिका सदस्यांना बसत आहे. पालिकेतील १२२ सदस्यांचा नगरसेवक निधी लक्षात घेतल्यास ९१ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, डीएसआर रेट अधिक असल्याने प्राकलन जादा दराने बनते आणि नगरसेवक निधीचे पत्रही त्याच नुसार घेतले जाते. मात्र, ठेकेदार काम घेताना २५ ते ४० टक्के पर्यंत कमी दराने निविदा भरतात. सरासरी ३० टक्के म्हटले तरी तरतूद केलेल्या एकूण रकमेतून २५ ते ३० कोटी रुपये खर्च होतच नाही, असा दावाही तिदमे यांनी केला आहे.
शिल्लक निधी वापरण्यास मिळावा
अंदाजपत्रकातील तरतुरीचा पूर्ण लाभ नगरसेवक निधीला लाभत नाही. त्यामुळे कार्यादेश झाल्यानंतर उर्वरित शिल्लक निधी पुन्हा संबंधित पालिका सदस्यांना वापरण्यास मिळाला पाहिजे. डी.एस.आर. रेट अधिक असल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकातील आकडेवारी फुगत असल्याचे लक्षात येते.
- प्रवीण तिदमे, नगरसेवक, शिवसेना