नाशिकच्या वेठबिगार दाम्पत्याची गोठ्यातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:11 PM2020-02-08T16:11:58+5:302020-02-08T16:12:13+5:30
नगर जिल्'ात वास्तव्य : श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नांना यश, गुन्हा दाखल
समाधान कडवे, वैतरणानगर : ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगडनंतर आता श्रमजीवी संघटनेच्या वेठबिगार मुक्तीची मोहीम अहमदनगर जिल्'ात धडकली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील साकुर फाटा येथील कातकरी समाजाच्या दाम्पत्याची नगर जिल्ह्यातील कोतूळ येथील मालकाच्या गुलामीच्या पाशातून मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित मालकावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी तब्बल आठ तास घेतले परंतु, श्रमजीवी संघटनेच्या चिवटपणापुढे पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करणे भाग पडले.
अकोले येथील दत्तात्रेय आणि सुखदेव गीते यांनी भारती आणि किरण जाधव यांना पाच हजार बयाना देऊन तबेल्याच्या कामासाठी ठेवले होते. काही पैसे देऊन त्यांच्याकडून १५ ते १८ तास काम करुन घेतले जात होते. दिवाळीच्या सणासाठी हे दाम्पत्य आपल्या घरी आले परंतु, त्यांना परतण्यास विलंब झाल्याने मालकाकडून धमक्या दिल्या गेल्या. त्यातच अंगावर दिलेले पैसे परत कर त नाही तोपर्यंत किरणला बंधक बनवण्यात आल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. सदर घटना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा त्यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित ,सरचिटणीस विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर गाठले आणि या मजुरांची मुक्तता करत मालकावर गुन्हा दाखल करण्यात यश मिळवले. अकोले तालुक्यातील कोतूळ या ठिकाणी एका गाईच्या गोठ्यात या दाम्पत्याला काम देण्यात आले होते. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर दाम्पत्यास घेऊन पोलिस स्टेशन गाठले परंतु, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तास लावले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्रमजीवीचे भगवान मधे यांनी सांगितले.
सीसीटीव्हीवरुन नजर
सदर दाम्पत्यास गाईच्या गोठ्यात काम देण्यात आले होते. सदर गोठ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यादद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जायची, असे तक्रारीत म्हटले आहे. गोठ्यात एकूण ३८ गाई होत्या. त्यांना चुकून चारा न टाकल्यास संबंधित मालकाकडून सीसीटीव्हीदद्वारे पाहून दाम्पत्याला शिवीगाळ करत असे. शिवाय, आजारी असतानाही काम करुन घेतले जात असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.