नाशिक कृउबा सभापती चुंभळे अखेर पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:15 AM2020-02-25T00:15:41+5:302020-02-25T00:28:12+5:30
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाने सोमवारी (दि. २४) आणखी एक निर्णायक वळण घेतले. ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाने सोमवारी (दि. २४) आणखी एक निर्णायक वळण घेतले. समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर दाखल अविश्वास ठराव १५ विरुद्ध १ मताने मंजूर झाला असून, त्यामुळे चुंभळे यांना पायउतार व्हावे लागले आहे.
अनेक वर्षे या बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे आणि त्यांना पायउतार करून ही समिती ताब्यात घेणारे शिवसेनेचे शिवाजी चुंभळे यांच्यावर दोन वर्षांपासून शह- काटशहचे राजकारण सुरू आहे. विशेषत: केवळ दोनच संचालक असताना सभापतिपदी विराजमान झालेल्या शिवाजी चुंभळे यांच्याविरुद्ध संचालकांनी दंड थोपटल्याने त्यांच्या सभापतिपदावर कधीही गंडांतर येण्याची शक्यता सध्याच्या राजकारणामुळे वर्तवली जात आहे. चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केलेली कारवाई, त्यातच चुंभळे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यातून १२ सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दखल केला
होता. त्यानुसार सोमवारी (दि. २४) बाजार समितीत विशेष बैठक बोलविण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हातवर करून मतदान केले, तर एका संचालकाने तटस्थ भूमिका घेतली. त्यात चुंभळे यांच्या सभापतिपदावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात येऊन प्रभारी सभापती म्हणून उपसभापती युवराज कोठुळे यांच्याकडे अधिकार देण्यात आले.