नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांचे निधन
By Admin | Published: July 9, 2017 12:40 AM2017-07-09T00:40:01+5:302017-07-09T00:40:28+5:30
नाशिक : सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी (दि.८) सकाळी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सायकल चळवळ विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी (दि.८) सकाळी निधन झाले. इगतपुरी-नाशिक या मार्गावर सायकलिंग करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सायकलवर प्रेम करणारे विर्दी यांनी सायकल चालवत असतानाच जगाचा निरोप घेतला.
शनिवारी सकाळी नाशिक रँडोनर्स मायलर्स (एनआरएम) या उपक्र मांतर्गत नाशिक-इगतपुरी-नाशिक असा सायकल प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सदर बाब सहकारी सायकलस्वारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने विर्दी यांना मोटारीतून पाथर्डी फाटा येथील खासगी रु ग्णालयात हलवले. आपत्कालीन विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी जसपालसिंग यांना मृत घोषित केले.जसपालसिंग विर्दी यांनी नाशिक सायकलिस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्र म राबवत सायकल चळवळ विकसित करण्याचा प्रयत्न अखंडित सुरू ठेवला होता. त्यांच्या अचानक जाण्याने नाशिकमधील सायकलिस्ट समुदायाला धक्का बसला आहे. सायकलिंगच्या प्रचारासाठी प्रचंड परिश्रम करत असलेला खरा सायकलिस्ट अशी जसपालसिंग विर्दी यांची ओळख होती. नाशिक-पंढरपूर सायकलवारीचे नियोजन, दिव्यांगांसाठीची सायकल राईड, राईड विथ ब्लाइन्ड्स, महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित केली जाणारी महिला रॅली, दिल्ली-मुंबई सायकल राईड असे अनेक उपक्र म त्यांनी नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून राबविले. नाशिकमधील सायकलिस्टने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेत म्हणून त्यांनी ‘नर्चर द टॅलेंट’ हा उपक्र म सुरू केला होता.जसपालसिंग विर्दी यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. जसपालसिंग विर्दी यांच्या पश्चात आजोबा गुरु देवसिंग विर्दी, वडील कुलजीतसिंग विर्दी, काका प्रीतपालसिंग विर्दी, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
जसपालसिंग विर्दी यांचे पार्थिव सातपूर येथील नाईस परिसरातील सिंग हाउस येथे ठेवण्यात आले असून, त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. ९) नाशिक अमरधाम येथे संध्याकाळी पाच वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.