Nashik: मनपाचे तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर, दादा भुसे यांनी केलं कौतुक

By Suyog.joshi | Published: September 10, 2023 04:02 PM2023-09-10T16:02:31+5:302023-09-10T16:03:05+5:30

Nashik: शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. गरिबातल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे सांगत महापालिका, नगरपालिकेच्या तंत्रस्नेही शिक्षकांमुळे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळाही मागे पडू लागल्या.

Nashik: Dada Bhuse praised the technology-loving teachers of the municipality | Nashik: मनपाचे तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर, दादा भुसे यांनी केलं कौतुक

Nashik: मनपाचे तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर, दादा भुसे यांनी केलं कौतुक

googlenewsNext

-  सुयोग जोशी 
नाशिक - शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. गरिबातल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे सांगत महापालिका, नगरपालिकेच्या तंत्रस्नेही शिक्षकांमुळे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळाही मागे पडू लागल्या, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराचे वितरण  भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भुसे यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त श्रीकांत पवार, शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील उपस्थित होते. प्रारंभी ईशस्तवन शैलेश चौधरी व त्यांच्या ग्रुपच्या वतीने म्हणण्यात आले. शिक्षकांना शाबासकीची थाप दिली तर ते आणखी जोमाने काम करतात. उत्कृष्ट पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा इतरही शिक्षकांनी आदर्श घ्यावा. शिक्षण क्षेत्रात कोणीही मागे राहू नये म्हणून स्मार्ट सिटीचा शासनाकडे परत चाललेला निधीही वापरत आहोत. या क्षेत्रात भविष्यातही वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना अधिक स्मार्ट करायचे आहे, असेही भुसे म्हणाले. प्रास्ताविक करताना बी.टी. म्हणाले, ३० प्रस्ताव आले होते, त्यातील १५ जणांना पुरस्कार देण्यात आला आहे. येथील शैक्षणिक वातावरण चांगले असून, शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. दप्तरमुक्त शाळेसह इतर विविध उपक्रम आम्ही राबविले आहेत. आमदार सीमा हिरे यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हा सन्मानाचा घटक असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन शीतल भाटे आणि मंगेश जोशी यांनी केले.

या शिक्षकांना पुरस्कार प्रदान
मनपा प्राथमिक शाळा मराठी माध्यमातील वैशाली क्षीरसागर (शाळा क्र. ७०, तोरणानगर), श्रीकृष्ण वैद्य (शाळा क्र. ५९, वडनेर दुमाला), जयश्री मराठे (शाळा क्र. ७७, अंबड), दत्तात्रय शिंपी (शाळा क्र. २८, सातपूर कॉलनी), किरण वाघमारे (शाळा क्र. ४९, पंचक, जेलरोड), रोहिणी मंडळ (शाळा क्र. ११, मखमलाबाद नाका), अनंत शिंपी (शाळा क्र. १३), सविता बोरसे (शाळा क्र. २१), श्रृती हिंगे (शाळा क्र. ८२), मनपा प्राथमिक शाळा उर्दू माध्यमातील काझी जहाआरा मोईनुद्दीन (शाळा क्र. ३१), मनपा माध्यमिक विभागातील राजेंद्र सोनार (मुख्याध्यापक, शिवाजीनगर, सातपूर), बाळासाहेब आरोटे (मनपा माध्यमिक शाळा, अंबड), खासगी प्राथमिक शाळेच्या ज्योती खंडेराव फड (नूतन मराठी प्राथमिक शाळा), किरण गणेश शिरसाठ (पाटील प्राथमिक विद्यालय), मंगला दीपक पवार (केंद्रप्रमुख, केंद्र क्रमांक ७) यांचा समावेश आहे.

शिक्षक ताटकळले
पुरस्कार वितरण कार्यक्रम दुपारी दोन वाजता असताना प्रत्यक्षात ३ वाजून ५० मिनिटांनी सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेले शिक्षक, त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळींना ताटकळत थांबावे लागले. त्यातच सूत्रसंचालक १५ ते २० मिनिटांत कार्यक्रम सुरू होईल, पाहुणे लवकरच पोहोचत आहेत असे अधून मधून सांगत होते. त्यामुळे उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

Web Title: Nashik: Dada Bhuse praised the technology-loving teachers of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.