नाशिक: जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू बाधितांची संख्या पोहोचली १६४ वर; प्रतिबंधक उपाय सुरु
By Suyog.joshi | Published: June 18, 2024 04:45 PM2024-06-18T16:45:01+5:302024-06-18T16:45:38+5:30
गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते
नाशिक (सुयोग जोशी): पावसाळ्याच्या तोंडावरच शहरात डेंग्यू बाधितांची संख्या थेट १६४ वर पोहाेचल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या १६४ व्यक्तींवर गेल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते. तर यावेळेस जानेवारी ते जून पंधरवड्यापर्यंत १६४ जण डेंग्यूने बाधित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरु असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.
महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून शहरातील सहाही विभागात डासोत्पत्ती केंद्र शोधले जात आहे. जेथे-जेथे डासोत्पत्ती केंद्र आढळून येत आहे, ते नष्ट केले जात आहे. शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नसली तरी डेंग्यू रुग्णांची संख्या दीडशे पार गेली आहे. त्यामुळे मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. मुख्यत: डेंग्यू पावसाळ्यात अधिक दिसून येतो. कारण पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचतात. मात्र, नंतर काही दिवसांनी त्या पाण्यामध्ये डेंग्यूचा संसर्ग करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते.
तसेच रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर, अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी आपल्या परिसरात, घराजवळ पाण्याचे डबके, कुठेही पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे. सहा महिन्यांतच रुग्णसंख्या १६४ वर गेली आहे. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात जाऊन त्वरित तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.
डेंग्यूवर उपाययोजना सुरु आहे. नागरिकांना लक्षणे जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जानेवारी ते जूनच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या १६४वर गेली असून, आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.
-डॉ.नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ मलेरिया विभाग, मनपा.