नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:57 IST2025-04-12T17:54:14+5:302025-04-12T17:57:54+5:30
नाशिकमध्ये हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज घडली.

नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी
नाशिकच्या अंजनेरी येथे डोंगरावर हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या भाविकांवर अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (१२ एप्रिल २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या एकाने मंदिराच्या पायऱ्यांवर शंखध्वनी केला. या आवाजाने परिसरात असलेली माकडे सैरभैर पळाली. त्यावेळी माकडांचा आसपासच्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीनिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या अंजनेरी येथे भाविकांची आज मोठी गर्दी उसळली. सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरील मार्गावर कोणीतरी शंखध्वनी केला, ज्याच्या आवाजाने माकडे इकडे तिकडे पळू लागली. त्यावेळी माकडांचा जवळ झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्या. यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला.
मधमाशांनी अचानक हल्ल्या केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. स्वत:ला मधमाशांपासून वाचवण्यासाठी अनेकजण डोंगरावर इतरत्र आसरा घेऊ लागले. या हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांना डोंगरावरून खाली उतरवण्यात आले. तसेच त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.